नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दोन रेल्वेगाड्यांची धडक होऊ नये म्हणून ‘कवच’ ही अत्याधुनिक प्रणाली बसवण्याचे काम जोमात सुरू आहे. ही आधुनिक सुरक्षा प्रणाली रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित करण्यास तसेच अपघात टाळण्यास उपयोगी ठरणार आहे.
नागपूर विभागांतर्गत नियोजित एकूण ९४ स्थानकांपैकी तीन स्थानकांवर स्टेशन टीसीएएस यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आले आहे, तर ९ स्थानकांवर काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय रेल्वे क्रॉसिंगच्या फाटकांवरील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी चार ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग-टीसीएएस प्रणाली बसवण्यात आली आहे.
फेज-१ अंतर्गत ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग’ बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ८,४६० पैकी ८,३९१ आरएफआयडी टॅग बसविण्यात आले आहे. म्हणजे सुमारे ९९.१८ टक्के काम झाले आहे. यामुळे ९४ पैकी ९२ ब्लॉक सेक्शनचा समावेश आहे. तसेच फेज-२ अंतर्गत तीन स्थानकांवर आरएफआयडी बसविणे व चाचणी घेण्याचे काम सुरू आहे.
रेल्वे इंजीन चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक ठरले आहेत. फेज-२ इंजीन चाचणी परासिया-इकलेहरा-पालाचौरी मार्गावर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले असून त्यामध्ये १०.७९ किलोमीटर मार्ग व दोन खंडांचा (सेक्शन) समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे फेज-१ इंजीन चाचणी एकूण नियोजित ९९१.४२ किलोमीटरपैकी ७१८.७४ किलोमीटर रेल्वे मार्गावर पूर्ण करण्यात आले आहेत.
कवच यंत्रणेअंतर्गत प्रस्तावित १५५ टॉवर्सपैकी ८३ टॉवर्स उभारण्यात आले आहेत. स्थानक, आरएफआयडी पायाभूत सुविधा, लोको चाचण्या तसेच टॉवर्स उभारणाचे वेगाने सुरू आहे. नागपूर विभागाच्या आधुनिक, तंत्रज्ञानाधारित रेल्वे सुरक्षा प्रणाली स्वीकारण्याच्या दिशेने प्रगतीपथावर आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

