नागपूर : राज्यात २९ महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच, नागपूर रेल्वे स्थानकावर अमली पदार्थ तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर नियमित देखरेखीदरम्यान संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. गांधीधाम सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगेतून अमली पदार्थ आढळून आले.
पुरी–गांधीधाम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून गांजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी तातडीची कारवाई करत पाच किलो गांजा जप्त केला.
नागपूर रेल्वे सुरक्षा दलाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) नागपूरच्या पथकाने नियमित देखरेखी दरम्यान ही कारवाई केली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. त्याचवेळी ट्रेन क्रमांक १२९९४ पुरी–गांधीधाम सुपरफास्ट एक्स्प्रेस नागपूर स्थानकात दाखल झाली. प्रवाशांच्या हालचालींवर नजर ठेवत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एका संशयित प्रवाशास पथकाने थांबविले.
प्राथमिक चौकशीत संबंधित प्रवासी त्याच्या ताब्यातील सॅक बॅगमधील साहित्याबाबत स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे आढळले. त्यामुळे संशय बळावल्याने बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान खाकी रंगाच्या टेपने व्यवस्थित गुंडाळलेली पाच पॅकेट्स आढळून आली. पॅकेट्समधून येणाऱ्या तीव्र वासामुळे अमली पदार्थ असल्याची खात्री पथकाला पटली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली. एनडीपीएस (अमली पदार्थ व मनोप्रभावी पदार्थ प्रतिबंधक) कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली. त्यानंतर राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, वजन-माप अधिकारी तसेच छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी विधिवत जप्ती पंचनामा करण्यात आला.
तपासात जप्त करण्यात आलेला पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन पाच किलोग्रॅम असून बाजारभावानुसार त्याची अंदाजे किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ७ जानेवारी २०२६ रोजी आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी जीआरपी नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, जीआरपी नागपूर यांनी एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रेल्वे मार्गाचा वापर करून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी तपास यंत्रणांनी सतर्कता वाढविण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
