नागपूर : आर्णी (जि. यवतमाळ) येथून बिहारकडे रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या २२ अल्पवयीन मुलांना बाल तस्करीच्या संशयावरून शुक्रवारी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आले. या मुलांसोबत एक मौलवी प्रवास करत होता. चाईल्डलाईनच्या सूचनेनंतर पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तातडीने कारवाई करत मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या संरक्षण आणि देखरेखीकरिता पाटनकर चौक येथील बालगृहात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व मुले आर्णी येथील एका मदरशामध्ये शिक्षण घेत आहेत. रमजानच्या सुट्ट्यांमुळे ही मुले मौलवीसोबत बिहारमधील त्यांच्या मूळ गावी जात असल्याचे सांगण्यात आले. अमृत भारत एक्स्प्रेसने ते बिहारकडे निघणार होते. दरम्यान, रेल्वे स्थानकावर नियमित तिकीट तपासणीदरम्यान टीटीईला एकाच व्यक्तीसोबत मोठ्या संख्येने अल्पवयीन मुले असल्याचे आढळून आले. मुलांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने टीटीईला संशय आला.

त्यानंतर टीटीईने याची माहिती तात्काळ रेल्वे सुरक्षा दलाला दिली. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर रेल्वेस्थानकावर चाईल्डलाईनच्या पथकाला पाचारण केले. त्यानंतर सर्व २२ मुलांना मौलवींची प्राथमिक चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान मुलांनी आपण मदरशात शिकत असून सुट्टीसाठी घरी जात असल्याचे सांगितले. मात्र, बाल तस्करीच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेता कोणताही धोका पत्करू नये, या भूमिकेतून पुढील तपास होईपर्यंत मुलांना संरक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चाईल्डलाईनच्या समन्वयाने सर्व मुलांना पाटनकर चौक येथील शासकीय बालगृहात हलवण्यात आले.

सध्या बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू असून, मुलांच्या पालकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतरच मुलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.