नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर वडील औषध आणण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधून सहा वर्षीय मुलाला आरोपीने पळवून नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा मिर्झापूरपर्यंत माग काढत मुलाची सुखरूप सुटका केली.

‘कंपनीत काम देतो’चे आमिष

राजस्थानातील पाली जिल्ह्यातील रहिवासी भंवरलाल रताराम चौहान हे मजुरी व मूर्ती रंगकामाचे काम करतात. कामानिमित्त ते हैदराबाद येथे गेले होते. काम नसल्याने ते तिन्ही मुलांसह राजस्थानला परतण्यासाठी २० सप्टेंबर रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी करण नावाच्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी ओळख वाढवली. ‘माझी कंपनी आहे, तुम्हाला काम देतो,’ असे सांगून त्याने चौहान व त्यांच्या मुलांना सोबत येण्यास प्रवृत्त केले. त्याने सिकंदराबाद ते दानापूरचे तिकीटही काढले.

नागपूर स्थानकावरून मुलाला घेऊन पसार

प्रवासादरम्यान नागपूर येथे उतरून रात्रभर थांबू आणि दुसऱ्या दिवशी बसने कंपनीत जाऊ, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार २० सप्टेंबरच्या सायंकाळी चौहान तिन्ही मुलांसह नागपूर रेल्वे स्थानकावर उतरले. संबंधित व्यक्तीने त्यांना जेवण दिले. त्यानंतर चौहान मुलांसाठी औषध आणण्यासाठी स्थानकाबाहेर गेले. ही संधी साधून आरोपीने सहा वर्षीय करणला ‘बाथरूमला घेऊन जातो’ असे सांगितले आणि त्याला सोबत नेले. मात्र, तो परतलाच नाही.

सीसीटीव्हीमुळे आरोपीचा माग

मुलगा बेपत्ता झाल्यानंतर चौहान यांनी २१ सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३५/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांनी तपास हाती घेतला. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बालकाला घेऊन अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित रेल्वेच्या मार्गावरील स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पथके रवाना करण्यात आली.

मिर्झापूरपर्यंत पोलिसांचा पाठलाग

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी बिहारी भाषेत बोलत होता. त्यामुळे तो बिहारच्या दिशेने जात असल्याचा पोलिसांना संशय आला. आरोपी व बालकाचे छायाचित्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. तसेच पोलिसांचे एक पथक रस्तेमार्गे पुढे रवाना करण्यात आले. शोधमोहीम सुरू असतानाच पोलिसांनी आरोपीचा माग काढत मिर्झापूर रेल्वे स्थानक गाठले.

२४ तासांत बालकाची सुखरूप सुटका

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर रेल्वे स्थानकावर मिथूनकुमार दयाचंद्र पासवान (वय २१, रा. काशोचक, ता. बिहार शरीफ, जि. नालंदा, बिहार) याला सहा वर्षीय करणसह ताब्यात घेण्यात आले. बालकाची सुखरूप सुटका करून आरोपीला नागपूर येथे आणण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बालकाचे अपहरण मानव तस्करीसाठी करण्यात आले होते की अन्य कोणत्या कारणासाठी, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही कारवाई लोहमार्ग नागपूरचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.