नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ आणि संबंधित यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून ८ एप्रिल ते २९ मे २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्वाच्या गाड्यांचे थांबे अजनी स्थानकावर हलविण्यात येणार आहेत. या बदलामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फलाट बंदचा निर्णय का?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यासाठी फलाट क्रमांक २ आणि यार्ड परिसरात तांत्रिक व देखभाल कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी संपूर्ण परिसर ५२ दिवस बंद ठेवणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही गाड्यांच्या नियमित हालचालींवर परिणाम होणार आहे.

प्रीमियम गाड्यांचे अजनीत तात्पुरते थांबे

या कालावधीत काही महत्त्वाच्या विशेष सुविधा उपलब्ध असलेल्या (प्रीमियम) गाड्यांना अजनी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात येणार आहे. यात १२२७० हजरत निझामुद्दीन- चेन्नई दुरंतो एक्सप्रेस (आठवड्यातून दोनदा – बुधवार व रविवार), १२२१४ दिल्ली सराई रोहिला – यशवंतपूर दुरंतो एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा – मंगळवार) आणि २२६९२ हजरत निझामुद्दीन – बंगळुरू राजधानी एक्सप्रेस (दररोज) यांचा समावेश आहे. या गाड्यांवर आयआरसीटीसीच्या ‘खानपान’ सेवांसाठी हा थांबा उपयुक्त ठरणार आहे.

वेळापत्रकात बदल

अजनी स्थानकावर या गाड्यांचे आगमन व प्रस्थान वेळाही निश्चित करण्यात आले आहेत. दुरातो आणि राजधानी गाड्यांचे थांबे साधारण दोन मिनिटांचे असतील. प्रवाशांनी आपल्या तिकिटांवरील तपशील आणि अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांसाठी सूचना

या बदलामुळे नागपूर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून अजनी स्थानकाचा वापर करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे, असेही रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.