नागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा बहुप्रतिक्षित पुनर्विकास वेगाने सुरू असताना, प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेली कुली (हमाल) सेवा मात्र या प्रक्रियेत दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. आधुनिक सुविधा, आकर्षक इमारती आणि प्रवासी-केंद्रित व्यवस्था उभारण्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सामान वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असलेल्या कुलींसाठी स्वतंत्र कक्षाची कोणतीही व्यवस्था नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अस्तित्वात असलेला कुली कक्ष पुनर्विकास कामात तोडण्यात आला असून, नव्या इमारतीच्या आराखड्यात कुलींसाठी बसण्याची किंवा थांबण्याची जागा समाविष्ट नसल्याचे दिसून येते. नागपूर रेल्वे स्थानकावर सुमारे १४५ कुली कार्यरत आहेत. हे कुली क्रमांक पद्धतीने सेवा देतात. प्रत्येकाला आपला क्रमांक येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठी बसण्याची व्यवस्था असणे आवश्यक असते. ही व्यवस्था नसेल, तर एकीकडे कुलींची गैरसोय होणार असून दुसरीकडे प्रवाशांनाही कुली शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, पुनर्विकास प्रकल्पांतर्गत संत्रा मार्केट प्रवेशद्वार बाजूची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहेत. आगमन भवनाच्या टेरेस स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, प्रस्थान भवनाला आधुनिक व आकर्षक स्वरूप प्राप्त होत आहे. युनिफाइड बेसमेंटची स्लॅब तयार झाली असून, सध्या फिनिशिंगची कामे सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षित हालचालींसाठी दक्षिण बाजूचा पादचारी पूल बदलण्याचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
पश्चिम बाजूच्या कामांत वेस्ट विंग बेसमेंटची स्लॅब कास्टिंग पूर्ण झाली आहे. परिसरातील रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून, सुमारे अर्धे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांच्या सुलभतेसाठी प्लॅटफॉर्म सहा व सातवरील पादचारी पुलासाठी ५४ मीटरचा रॅम्प तयार करण्यात आला आहे. तसेच प्लॅटफॉर्म चार, पाच आणि सहा-सातसाठी १०८ मीटर उंचीच्या एलिव्हेटेड कॉनकोर्ससाठी पायाभूत कामे, लिफ्ट, एस्केलेटर व जिन्यांच्या संरचना पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या व्यापक पुनर्विकासात कुलींसाठी मूलभूत सुविधा न राखल्यास ‘प्रवासी-केंद्रित’ विकासाचा दावा फोल ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

