नागपूर : कोट्यवधी रुपये खर्च करून नागपूर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास सुरू असतानाही पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. मुसळधार पावसात स्थानक परिसर, प्रवेशद्वार आणि काही रेल्वे रुळांवर पाणी साचत असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील जलनिचरा व्यवस्थेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकाचा तब्बल ४८७.७७ कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास केला जात आहे. जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज स्थानक उभारणे आणि भविष्यात दररोज सुमारे एक लाख प्रवाशांची क्षमता निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मात्र, स्थानक परिसरातील वाढलेले बांधकाम, सिमेंट-काँक्रिटचे वाढते प्रमाण आणि बदललेला पाण्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेता पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगळवारी झालेल्या पावसात नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळ तलावासारखी स्थिती निर्माण झाली होती. गणेश टेकडीकडून येणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढत स्थानक गाठावे लागले. पश्चिम प्रवेशद्वारासमोरील पोर्च परिसरातही पाणी साचले होते. मुंबई एंडकडील प्रवेशमार्गावर पावसाच्या पाण्यासोबत चिखल आणि कचरा वाहून आल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. काही रेल्वे मार्गांवरही पाणी साचल्याचे दिसून आले.
दोन भूमिगत नाल्यांवरच जलनिचऱ्याचा भार
रेल्वेस्थानक परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्या दोन प्रमुख भूमिगत नाले आहेत. यापैकी एक नाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयाच्या मागील भागातून जयस्तंभ चौकाकडून येतो. तर दुसरा ब्रिटिशकालीन भूमिगत नाला सदर परिसरातून सुरू होऊन फलाट क्रमांक एकजवळून संत्रा मार्केटच्या दिशेने जातो. या दोन्ही नाल्यांमधून स्थानक परिसर आणि रेल्वे रुळांखालील पावसाचे पाणी बाहेर वाहून जाते. मात्र, सध्याच्या वाढत्या बांधकामामुळे आणि पावसाच्या पाण्याचा वाढलेला प्रवाह लक्षात घेता ही व्यवस्था अपुरी ठरत असल्याचे मत मध्य रेल्वेतून निवृत्त अभियंता जी.एम. शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
‘शक्ती नाल्या’च्या क्षमतेवर परिणाम
ब्रिटिशकालीन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जाणारा भूमिगत ‘शक्ती नाला’ सध्या अतिक्रमणे, घरगुती सांडपाणी जोडण्या आणि कचऱ्यामुळे तुंबला आहे. सदर परिसरातून सुरू होणारा आणि कॉटन मार्केटजवळ नाग नदीला मिळणारा हा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा नाला सदर संकुल, गड्डीगोदाम, सेंट जॉन्स शाळा परिसर, मोहननगर, राम झुला आणि पोद्दारेश्वर राम मंदिर मार्गे रेल्वे स्थानकाखालून जातो. सदर, गड्डीगोदाम आणि मोहननगर या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये स्वतंत्र पावसाळी जलवाहिनी व्यवस्था नसल्याने हा नाला पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी महत्त्वाचा आधार आहे. मात्र, नाल्यालगत झालेली अतिक्रमणे, सांडपाणी जोडण्या आणि गाळ साचल्यामुळे त्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. काही भागांत नाल्याची खोली आठ फुटांवरून सुमारे तीन फुटांपर्यंत कमी झाल्याचे सांगितले जाते. रेल्वेस्थानकाखालून जाणारा सुमारे १०० मीटरचा भाग अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. या भागातील गाळ आणि अडथळे दूर केल्यास पावसाळ्यात जलनिचरा अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.
मार्च २०२७ पर्यंत पुनर्विकास पूर्ण होणार
नागपूर रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुनर्विकासाच्या माध्यमातून आधुनिक सुविधांचे स्थानक उभारण्याचा प्रयत्न होत असला, तरी भविष्यातील वाढती प्रवासी संख्या आणि बदलत्या पावसाच्या स्वरूपाचा विचार करून जलनिचरा व्यवस्थेचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पानंतरही पावसाळ्यात स्थानक परिसरात पाणी साचण्याची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाचा दावा
रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रेनेज लाईनची व्यवस्था केल्याचे स्पष्ट केले आहे. ही ड्रेनेज लाईन नागपूर महापालिकेच्या गणेश टेकडी रोडकडील ड्रेनेज व्यवस्थेशी जोडण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले.
तीन नवीन भूमिगत पावसाळी नाल्यांची गरज
गणेश टेकडी म्हणजेच पश्चिम प्रवेशद्वारापासून संत्रा मार्केट प्रवेशद्वाराकडे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे. पावसाचे पाणी वेगाने बाहेर काढण्यासाठी किमान तीन नवीन भूमिगत नाल्या बांधण्याची आवश्यकता आहे, असे रेल्वेतून निवृत्त झालेले अभियंता जी.एम. शर्मा यांनी सांगितले.
