नागपूर : निष्काळजीपणातून घडलेली एक धोकादायक घटना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. तलावात अंघोळ केल्यानंतर मित्रासोबत लावलेल्या पैजेपायी एका अल्पवयीन मुलाने धावत्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पैज ठरली धोकादायक
तलावात अंघोळ केल्यानंतर ‘निशाणेबाजी’ सिद्ध करण्यासाठी दोन मित्रांमध्ये पैज लागली. त्या पैजेच्या नादात एका मुलाने चालत्या रेल्वेवर दगड फेकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय क्षणिक उत्साहातून घेतला असला तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकले असते.
कोचच्या काचेवर दगड
रविवारी गाडी क्रमांक १२१०१ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रसमडा-दूर्ग मार्गावरून जात असताना किलोमीटर ८६९/१०-१२ दरम्यान दगडफेक झाली. फेकलेला दगड थेट सामान्य कोचच्या काचेवर जाऊन आदळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आरपीएफची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफने परिसराची तपासणी केली. बघेरा गेटजवळ दोन अल्पवयीन मुले संशयास्पद अवस्थेत आढळली. चौकशीदरम्यान एका मुलाने आपली चूक कबूल केली.
पालकांसमोर कबुली, गुन्हा दाखल
संबंधित मुलांनी आपल्या पालकांसमोरही घडलेला प्रकार मान्य केला. या प्रकरणी आरपीएफ पोस्ट राजनांदगाव येथे रेल्वे अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे प्रशासनाचा इशारा
चालत्या रेल्वेवर दगडफेक करणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ १३९ या हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
