नागपूर : बुधवारी रात्री नागपुरात तासभर झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, याच पावसामुळे नागपूरकरांना वर्धा रोडवर अनोख्या धबधबा बघण्याची संधीही मिळाली. रात्री वाहनांचे लाल, पिवळे चकाकणारे दिवे आणि त्यावर या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचे आकर्षक दृश्य अनेकांनी कॅमऱ्यासोबत नजरेतही कैद केले.

उड्डाणपूल ठरले आकर्षणाचे केंद्र

नागपुरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, तर सखल भागांमध्ये पाणी घरांच्या परिसरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र वर्धा मार्गावर नागरिकांना सुखद धक्काही बसला. वर्धा मार्गावरील उड्डापूलावर साचलेल्या पाण्याच्या अनेक धारा खाली कोसळल्या. अंशत: धबधब्याचे स्वरुपच या उड्डाणपूलाखाली आले होते. जोरदार धारा आणि रस्त्यांवरील जाणाऱ्या वाहनांच्या रंगबेरंगी दिव्यांच्या प्रकाश, अशी पर्वणीच नागरिकांना मिळाली. त्यामुळे काही वेळ का होईना उड्डाणपूल आकर्षक झाले अन शहराच्या सौंदर्यातही भर पडली होती. काहींनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करून व्हीडीओ तयार केले. ते समाजमाध्यमावर प्रसारित केले.

अनेक रस्ते जलमय, झाडे कोसळली

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. शहरातील मुख्य चौक, उड्डाणपुलाखालील मार्ग तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला. नाले आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांवर ताण आल्याने अनेक भागांत पाणी साचून राहिले. विजांच्या कडकडाटामुळे काही परिसरांत काही काळ वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसांकरिता शहरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

जुलैच्या पहिल्याच दिवशी आनंदसरी

जून महिना नागपूरकरांसाठी कोरडा गेला. परंतु जुलैच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने नागपूरकरांवर मेहेरबानी करत शहराला अक्षरशः चिंब केले. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरत धुवाधार बरसात केली. गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला. पावसामुळे कमाल तापमानात २.२ अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहिले, जे सरासरीपेक्षा ३.९ अंशांनी कमी होते. रात्रीच्या जोरदार पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाडा आणि दमट हवेमुळे होणारा त्रासही लक्षणीयरीत्या कमी झाला. मात्र शहरातील सदर, मनीष नगर, लोहापूल, मंगळवारी बाजार येथे पाणी साचल्याने नागरिकांची कोंडीही झाली.