Hit and run : नागपूर : बागकामांसाठी निघालेल्या ज्येष्ठाला भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने जोरदार धडक देत पळ काढला. शहरातील अत्यंत वर्दळीच्या रामदासपेठ येथे वेस्ट कार्ट इमारतीसमोर शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
श्यामलाल मेढाई वर्मा (७०) रा. प्रतापनगर, उत्तर प्रदेश असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. श्यामलाल हे सध्या काछीपुरा भागातील तुळशीदास कश्यप यांच्या घरी भाड्याच्या खोलीत रहात होते. परिसरातील घरांमध्ये बागेची कामे करून श्यामलाल हे ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ते आपल्या सायकलने रोजच्या प्रमाणे बागेची कामे करण्यासाठी निघाले. वेस्ट कार्ट इमारतीसमोर श्रीमद रामचंद्र चौकात भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात श्यामलाल यांना अंतर्गत जबर दुखापती झाल्या. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढवला.
परिसरातील नागरिकांनी काहीतरी जोरदार आवाज आल्याने घराबाहेर येऊन पाहताच अपघात झाल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकणात कारचालकाविरोधात हिट अँट रचना गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटीव्हींचा शोध सुरू केला आहे.
दोन आठवड्यातील दुसरी घटना
महाविद्यालये, शिकवणी वर्गांच्या वाढत्या संख्येमुळे रामदास पेठ, गोकूळपेठ, धरमपेठ सारखे परिसर शहरातल्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणापैकी एक आहेत. या भागात सातत्याने अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दोनच आठवड्यांपूर्वी योगासनच्या वर्गाला निघालेल्या मंगला रामदासपंत केवटे (७२) या ज्येष्ठ महिलेला कारचारलकाने धडक दिली होती. यात केवटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
धरमपेठेतील चिल्ड्रन्स ट्राफिक पार्क समोरील सुगंध मंगल कार्यालयाजवळ प्राणांतिक अपघाताची ही घटना घडली होती. त्याच्या अगदी काही दिवसांतच पुन्हा एका कारचालकाने सायकलवरून कामावर निघालेल्या ज्येष्ठाला चिरडल्याने रस्ते सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे.
