नागपूर : घरात नागाचे एक पिल्लू दिसल्याने कुटुंबीयांनी परिसराची पाहणी सुरू केली. मात्र, पुढे जे समोर आले ते पाहून त्यांची अक्षरशः भंबेरी उडाली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल ४० नागाची पिल्ले आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटना नेमकी कुठे?

नेरला येथील राजू ढोमने यांच्या घरात ही घटना उघडकीस आली. घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागाची पिल्ले दिसताच नागरिकांनी चाचेर येथील वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्र रतन कुंभरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली.

अत्यंत सावधगिरी बाळगत आणि कोणतीही इजा न होऊ देता सर्व ४० नागाच्या पिल्लांना सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यानंतर रामटेक वन विभागाशी संपर्क साधून सर्व पिल्ले वन कार्यालयात आणण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक गोविंदकुमार लूचे आणि क्षेत्रीय वनाधिकारी राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर या सर्व नागाच्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

सर्पमित्रांच्या तात्परतेमुळे धोका टळला

सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे नागरिकांवरील संभाव्य धोका टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. यावेळी सर्पमित्र राहुल कोटेकर आणि अजय मेहरकुळे यांनी नागरिकांना साप दिसल्यास घाबरून जाऊ नये, तसेच नागाला किंवा सापाला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. अशा वेळी तातडीने अनुभवी सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. या बचाव मोहिमेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. तसेच वन्यजीव संरक्षण आणि नाग तसेच सापांविषयी योग्य जनजागृती होण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास

पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत किंवा उबदार, सुरक्षित जागांमध्ये अंडी घालणाऱ्या नागाची पिल्ले एकाच वेळी बाहेर येण्याच्या घटना अधूनमधून घडतात. घरांच्या पाया, लाकडांचे ढीग, जुने सामान, दगड-वीटांच्या फटी किंवा उंदरांची बिळे अशा ठिकाणी साप आश्रय घेतात. तज्ज्ञांच्या मते, नागाची पिल्ले जन्मतःच विषारी असली तरी ती विनाकारण हल्ला करत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत घाबरून जाऊन नागांना किंवा सापांना मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. परिसरात मोठ्या संख्येने नागाची पिल्ले आढळल्याने स्थानिकांमध्ये कुतूहलासह भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र आणि वन विभागाच्या समन्वयामुळे सर्व पिल्लांची सुरक्षित सुटका करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.