नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगाव येथील एस. बी. एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणऱ्या डिटोनेटर कंपनीत रविवारी सकाळी भीषण साखळी स्फोट झाले. यात १८ कामगारांचा जागिच मृत्यू तर १८ जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींपैकी ९ रुग्ण पन्नास टक्केहून अधिक भाजले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने मृत्यूसंख्या १९ वर पोहचली आहे. इतर जखमींबाबत महत्वाची अपडेट पुढे येत आहे.
नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयातून आलेल्या महत्वाच्या माहितीनुसार, रंजना घागरे (३४) या रुग्णाचा २ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ७० टक्के भाजल्याच्या जखमा असून तीव्र रक्तदाब घसरणे व उजव्या मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान रुग्णालयात सध्या आणखी महिला संवर्गातील १७ रुग्ण दाखल असून त्यापैकी ८ रुग्ण हे पन्नास टक्केहून अधिक भाजलेल्या अवस्थेत आहे. येथील तज्ज्ञांकडून रुग्णावर उपचार सुरू आहे. दाखल रुग्णांमध्ये ७५ टक्के, ७० टक्के, ६० टक्के भाजलेल्या रुग्णांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तर १५ टक्के ते ६० टक्यांपर्यंत भाजलेले ८ रुग्णही येथे उपचार घेत आहे. सगळ्याच रुग्णांची प्रकृती चिंताजणक असल्याचे डाॅक्टरांचे म्हणने आहे.
रुग्णालय प्रशासनाचे म्हणने काय ?
बहुतांश रुग्णांना स्फोटाच्या उष्णतेमुळे ३० ते ८० टक्क्यांपर्यंत भाजल्याच्या जखमा आहेत. काहींना स्फोटातील तुकड्यांमुळे जखमा झाल्या असून काहींना हात- पायांच्या हाडांचे फ्रॅक्चर, तसेच ऐकण्यास कमी येणे अथवा बहिरेपणाची लक्षणे दिसून येत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. काहींवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयाचा आपत्कालीन पथक तात्काळ सक्रिय करण्यात आले. प्लास्टिक शस्त्रक्रिया, अस्थिरोग, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता व अंतर्गत औषधोपचार तज्ज्ञांच्या पथकाकडून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भाजलेल्या जखमांवरील मृत त्वचा काढणे, जखमांची स्वच्छता व बांधणी, तसेच फ्रॅक्चरवर बाह्य आधार बसविणे अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. उषा नायर यांनी सांगितले की, “गंभीर स्फोट व बहुअवयव जखमी रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून विशेष उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांना आवश्यक ती अतिदक्षता सेवा दिली जात आहे.”
रुग्णांची नावे काय ?
ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये कविता उईके (४५), दुर्गा घाटगे (३१), वैशाली धुर्वे (३०), सुनीता उईके (३५), ज्योती धुर्वे (२१), सुजाता रक्षित (३५), मयुरी धुर्वे (२४), मनीषा धुर्वे (४२), वैशाली सटई (४०), उषा रेवटकर (४३), काजल कौराती (३१), रोशनी उमाटे (३२), सीमा धुर्वे (२७), अमरपाली कळसर्पे (३६), ऋतु सलाम (२०), दुर्गा सेवटकर (४२), रोशनी मसराम (३२) यांचा समावेश आहे.
