नागपूर: आम्ही सगळ्या महिला कामगार सकाळी सव्वा सातला नोनल युनिटला लागून पॅकिंग युनिटमध्ये पोचलो. माझी ड्यूटी स्लरी युनिटमध्ये होती. कपडे बदलून आत जातही नाही तोच शेजारच्या नोनल युनिटमधून मोठ्या स्फोटाच्या आवाजाने कानठळ्या बसल्या. घाबरलेल्या अवस्थेत आम्ही धावत बाहेर आलो अन् समोर पाहतो तो मृत्यू डोळ्यासमोर नाचत होता. पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने तीन महिला धावत बाहेर आल्या. त्यांच्या पाठीमागे पडला होता रक्ताचा सडा, हाडामांसाचा चिखल आणि आगीचा भडका.

अंगाचा थरकाप उडवणारा डोळ्यांदेखत घडलेला हा मृत्यूचा तांडव सांगत होत्या अर्चना मडके. धवलापूर येथील रहिवासी अर्चना या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. पाच वर्षांपासून त्या राऊळगावच्या एस.बी.एल. एनर्जी स्फोटक कंपनीत कामगार आहेत. रविवारी झालेल्या भीषण स्फोटात धवलापूर या एकाच गावातील संगिता पंचभाई, प्रतिभा उर्फ उज्ज्वला वलके आणि दुर्गा गायकवाड या तीन महिलांच्या शरीराचा कोळसा झाला. त्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या अर्चना मडके यांनी डोळ्यांदेखत घडलेल्या मृत्यूचा तांडव जशास तसा मांडला.

हा प्रसंग कसाबसा सांगताना भावूक झालेल्या अर्चना मडके बोलत्या झाल्या. त्या म्हणाल्या, एकत्र शिफ्ट असेल तर आम्ही सगळ्याच जणी रोज एकत्र घरून निघत होतो. कंपनीत पोचायला किमान एक ते दीड तास लागतो. त्यामुळे आम्ही रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घर सोडले. रविवारी माझी शिफ्ट नोनल युनिटला लागून स्लरी युनिटमध्ये होती. तर संगिता आणि प्रतिभाची ड्यूटी नोनलयुनिटमध्ये होती. कपडे बदलून काम सुरू करत नाही तोच एक मोठा आवाज आला. भीतीमुळे आम्ही बाहेर आलो. तोच समोर आगीचा डोंब उसळला होता. त्यातून तीन महिला अर्धवट पेटलेल्या अवस्थेत धावत होत्या. त्यांच्या अंगावरचे कपडे पूर्णतः जळाले होते.

डोळ्यांसमोर तडफडल्या मैत्रिणी

गेल्या पाच वर्षांपासून कंपनीत कामाला असल्याने माझी अनेक महिलांची ओळख होती. शिफ्ट सुरू होताना आणि संपताना आम्ही एकत्रच घरी जायचो. घटना घडली तेव्हा ओळखीतल्या काही महिलांना डोळ्यांदेखत तडफडून मरत असताना मी पाहिले आहे. आयुष्यात हा प्रसंग विसरता येणार नाही.

पोटासाठी आली आणि…

बोलता बोलता भावुक झाल्यानंतर डोळ्यांच्या धारा पुसत त्यांनी स्वतःला सावरले. जड अंतःकरणाराने त्या सांगत होत्या, घटनेच्या दिवशी देखील मी, संगिता, निता भगवान मोरे, पूनम प्रदीप धापोडे आणि गजेंद्र राऊत या पाच जणी एकत्रच राऊळगावला गेलो. माझी मैत्रिण संगिताला डोळ्यांदेखत पेटलेले मी पाहिले आहे. तिची मुलगी गौरी १२ वीत तर मुलगा तुफान १० वीत शिकतो आहे. आजनगावात मजुरी मिळत नसल्याने ती माझ्यासोबत बीएसएल कंपनीत काम करायची. तिचे वडील प्रभाकर हे देखील कंपनीतच सुरक्षा रक्षक आहेत. १० मिनिटांपूर्वी गेट ओलांडून आत गेलेल्या मुलीचा कोळसा झालेला मृतदेहच पहायला मिळेल, याची जन्मदात्या बापाने देखील कल्पना केली नसेल.