नागपूर: नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटात १७ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अप्रत्यपक्षपणे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्र, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. बाजारगाव परिसरात असलेल्या सर्वच स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये वारंवार होत असलेले स्फोटामुळे कामगारांचा मृत्यू होत आहे. ही गंभीर बाब असून या परीसरातील सर्वच स्फोटके कंपनीचे सुरक्षा अंकेक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीयमंत्री, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था व संबधीत विभागाकडे पत्र लिहून केली होती. परंतु याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने परत आज एक मोठी दुघटना घडल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. वेळीच सुरक्षा अंकेक्षण केले असते तर आजची घटना टाळता आली असती असे मत त्यांनी व्यक्त केले.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राउळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन १७ कामगारांचा बळी गेला आहे, तर १८ हून अधिक कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कामगार वर्गात आणि परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तथापि, राज्य आणि केंद्र सरकारने या गंभीर मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. जर वेळीच सुरक्षा अंकेक्षण केले असते, तर आजची भीषण दुर्घटना टाळता आली असती. पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनेचे (पेसो) देशातील मुख्य कार्यालय नागपुरातच आहे, तरीही नागपूरमध्ये स्फोटांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत ही गंभीर बाब असल्याचेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
या कंपन्यांमध्ये स्फोटके अधिनियम, १८८४ आणि कारखाना अधिनियम, १९४८ नुसार सुरक्षा उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु, वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे असे दिसते की सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत आहे आणि संबंधित शासकीय यंत्रणा असलेली ‘पेसो’ आणि ‘डिश’ आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत. आज घडलेल्या दुघटनेमध्ये मृत कामगारांना राज्य सराकारने २५ लाख रुपये तर कंपनीने ५० लाख रुपयाची मदत करावी. तसेच तातडीने बाजारगाव परिसरात असलेल्या सर्वच स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांचे सुरक्षा अंकेक्षण करावे. ज्या स्फोटके कंपनी कामागारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असतील त्या कंपन्या बंद करा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
जखमींची विचारपूस
अनिल देशमुख यांनी घटना स्थळी जावून पाहणी केली. तसेच कंपनी मालक यांच्यासोबत फोनवरुन चर्चाकरुन मृतकांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयाची मदत करावी तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करावा अशी मागणी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात जखमींची विचारापूस करीत डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
