नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोटक निर्मिती करणाऱ्या ‘एसबीएल’ कंपनीत भीषण स्फोट होऊन सर्वच कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १२ मृतदेह नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहचले आहे. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी भाजलेल्या मृतदेहाची स्थिती बघून थक्क झाले.
मेडिकलमध्ये पोहचलेल्या मृतदेहमध्ये ११ पुरुष आणि १ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बारुद बनवणाऱ्या कंपनीत सकाळी काम सुरू होताच अचानक स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राऊळगाव येथील ‘एसबीएल’ कंपनीत खाणकामासाठी लागणारे डिटोनेटर व इतर स्फोटके तयार केली जातात. कामगार नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर निर्मिती प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित युनिटचा काही भाग कोसळल्याचीही माहिती मिळत आहे. धुराचे प्रचंड लोट आकाशात झेपावले होते.
३५ कामगार उपस्थित
घटनेच्या वेळी संबंधित विभागात सुमारे ३५ कामगार काम करत होते. स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमुळे आणि ढिगाऱ्यामुळे काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहाचा जवळजवळ कोळसा झाला आहे.
प्रशासनाची धाव, बचावकार्य वेगात
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जखमी कामगारांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा सुरू आहे. घटनेमुळे काटोल तालुका हादरला असून स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
