नागपूर : नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे यांना प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवत राज्याच्या आरोग्य विभागाने निलंबित केले आहे. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनोरुग्णालयात काही आठवड्यापूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आकस्मिक पाहणीनंतर समोर आलेल्या त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाबाबत आपण आणखी जाणून घेऊ या.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर काही आठवड्यांपूर्वी मनोरुग्णालयात पोहचलो होते. येथे त्यांनी स्वयंपाकगृहासह विविध विभागांची पाहणी केली होती. या पाहणीत स्वच्छता, अन्न व्यवस्थापन आणि एकूणच प्रशासनातील अनेक त्रुटी आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या मार्फत सविस्तर चौकशी करण्यात आली.

चौकशी अहवालात डॉ. हुमणे यांच्या प्रशासकीय कामकाजावर गंभीर ठपका ठेवण्यात आला. अहवालानुसार रुग्णालयातील दैनंदिन व्यवस्थापन, सुविधा आणि नियंत्रण यामध्ये त्रुटी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे आरोग्य विभागाने १६ मार्च रोजी निलंबनाचा आदेश जारी केला.

रुग्णालयाची अतिरिक्त जबाबदारी कुणाकडे…

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुमणे यांना निलंबित केल्यावर तातडीने रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. मोहबे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच निलंबन काळात डॉ. हुमणे यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत मुख्यालय सोडण्यासाठी त्यांना सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

निलंबन अन्यायकारक – डॉ. हुमणे

निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना डॉ. सतीश हुमणे यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी रुजू झाल्यानंतर रुग्णालयातील सुधारणा करण्यासाठी विविध पावले उचलल्याचा दावा त्यांनी केला. यात मनोरुग्णांसाठी स्टेनलेस स्टीलचे बेंच, १२५ वर्षे जुनी ड्रेनेज लाईन दुरुस्ती यांसह इतर कामांसाठी सुमारे ४.०६ कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

औषधांची कमतरता दूर करण्यासाठी नागपूर जिल्हा खनिज निधीतून निधी मिळवणे, रुग्णांसाठी कौटुंबिक मिलन कार्यक्रम राबवणे, तसेच रुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन विविध ठिकाणी सादर करणे अशा उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. या उपक्रमांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशंसा केल्याचे हुमणे यांनी नमूद केले. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यावर करण्यात आलेले निलंबन अन्यायकारक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.