नागपूर : आयुष्याच्या वळणावर हरवलेली नाती, विस्कटलेले आयुष्य आणि मनावरचे आजारपण… पण तरीही ‘घरी परतण्याची आस’ कधीच मरत नाही, याचे हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे ५२ वर्षीय ‘दमयंती’ची कहाणी ठरली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर आंतरराज्यीय पुनर्वसनाच्या माध्यमातून ती पुन्हा आपल्या मातीमध्ये, आपल्या माणसांत परतली आहे.
असा लागला नातेवाईकांचा शोध…
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात २०१४ पासून उपचार घेत असलेली दमयंती अनेक वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर होती. तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर जवळपास दोन वर्षांच्या चिकाटीच्या शोधानंतर तिच्या आयुष्यात आशेचा किरण उजळला. पोलिसांच्या मदतीने आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तिचे मूळ गाव, पती आणि हैदराबादमध्ये राहणारी बहीण यांचा शोध लागला. मात्र, नातेवाईक सापडले तरी परिस्थिती तितकीच वेदनादायक होती. मुलांनी स्वतःचे मार्ग निवडले होते, पती मंदिराबाहेर भीक मागत होता, तर बहिणही मानसिक आजाराने त्रस्त होती.
तरीही, दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉलवर झालेल्या संवादातून दमयंतीच्या मनात ‘घरी जाण्याची’ तीव्र इच्छा पुन्हा जागी झाली. ही भावनिक हाक ओळखून रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक कुंदा काटेखाये बिडकर यांनी पुढाकार घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमरीश मोहबे आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पंकज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद पोलिसांशी समन्वय साधण्यात आला. पुढे तेलंगणातील ‘डॉ. अन्नम सेवा फाउंडेशन’नेही सकारात्मक प्रतिसाद देत “दोन्ही बहिणींना एकत्र ठेवण्याची” मानवी भूमिका घेतली.
ताबा संस्थेकडे सोपवला…
संपूर्ण प्रकरण मानसिक आरोग्य कायदा २०१७ अंतर्गत न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आवश्यक संमती व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ मे २०२६ रोजी दमयंतीला नागपूरहून खम्मम (तेलंगणा) येथील आश्रमात रवाना करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी ती तेथे सुखरूप पोहोचली आणि तिचा ताबा संस्थेकडे सोपविण्यात आला. या पुनर्वसनामुळे दमयंतीला केवळ उपचारच नव्हे, तर आपुलकीची माणसे, मातृभाषा आणि भावनिक आधार पुन्हा मिळणार आहे. पती आणि बहिणीच्या सहवासात तिच्या आयुष्याला नवा अर्थ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे काय ?
मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमरीश मोहबे म्हणाले, मानसिक आरोग्य सेवेत केवळ औषधोपचार नव्हे, तर रुग्णाच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काला प्राधान्य दिले पाहिजे. “या प्रकरणातून आम्ही एका रुग्णाला तिच्या मुळांशी पुन्हा जोडू शकलो, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. समाजसेवा अधिक्षक कुंदा काटेखाये बिडकर म्हणाल्या, रुग्णाला औषधांइतकीच नात्यांची ऊब आवश्यक असते. दमयंतीच्या डोळ्यातील ‘घरी जाण्याची आस’च आम्हाला पुढे घेऊन गेली. हे केवळ पुनर्वसन नसून एका आयुष्याला नव्याने अर्थ देण्याचा प्रयत्न आहे.”
