नागपूरात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. नागपूरात पारा ४४ अंशसेल्सियस पर्यंत पोहचला असून नागरिक उकड्याने हैराण झाले आहेत. उत्तर भारतातील मुख्यत्वे राजस्थान मधून उत्तर-पश्चिमच्या दिशेने येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आजपासून नागपूरात पुढील दोन दिवस हिट वेव्ह आणि त्यानंतर तीन दिवस सिव्हियर हिट वेव्हचा इशारा दिला आहे. त्यामुळे येणारे पाच दिवस नागपूरात तापमान अधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. नागपूर सह अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे नागरिकांनी उन्हात दुपारी १२ ते ४ या वेळेत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा, आवश्यक असेल तरच संपूर्ण काळजी घेत घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे.

उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध शितपेयाचा आधार घेत असून व्यापाऱ्यांनी दुकानात हिरव्या जाळ्यांचेचे शेड उभारून उन्हापासून बचाव करतांना पाहायला मिळत आहे. घरोघरी नागरिकांनी आपल्या अंगणात सावली आणि थंडावा निर्माण व्हावा यासाठी हिरव्या जाळ्या उभारल्या आहेत.

“गेल्या २४ तासात तापमान दोन ते तीन अंशसेल्सियस वाढ झाली आहे. वर्धा, ब्रम्हपूरी, चंद्रपूर सारख्या ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचसे आहे. तर अकोला, नागपूरमध्ये तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. पुढील पाच दिवसांत विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णता राहणार आहे. आज आणि उद्या काही ठिकाणी हीट व्हेवची परिस्थिती असणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस काही ठिकाणी हीट व्हेवची परिस्थिती असणार आहे. आता वाढत असलेले तापमान पाहून वाटत आहे की वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी तापमान वाढून हीट व्हेवची परिस्थिती निर्माण होणार आहे,” अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी दिली आहे.