नागपूर : राज्यात कुठेही आपत्ती आली तर एनडीआरफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पाठवले जाते. अनेकदा त्यांना पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे गाव पातळीवर स्थानिकांचे पथक तयार करुन त्याला प्रशिक्षण दिले जाईल व आपत्ती निवारणासाठी त्यांची मदत घेतली जाईल. या शिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर बाईक यंत्रणा तयार करणार असल्याची माहिती मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अनिल पाटील नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. गावात पूर आला, आग लागली किंवा अपघात झाला तर संबंधित यंत्रणेसह एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचतात. मात्र, अनेकदा त्यांना पोहचण्यास काही कालावधी लागतो. अनेकदा स्थानिक लोक अशावेळी मदत करत असतात. त्यामुळे गाव पातळीवर स्थानिक युवकांचे एक आपत्ती निवारन पथक तयार करण्याची योजना आहे. ग्रामपंचायतला त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे. हेही वाचा : अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या गावातील युवकांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य देऊन जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न केले जाईल. मात्र त्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. शिवाय अनेकदा आगीची घटना घडली तर गल्लीबोळामध्ये अग्निशमन विभागाच्या मोठ्या गाड्या जात नाहीत. त्यामुळे फायर बाइक तयार करण्यात येणार आहे. या बाइक अरुंद जागेत जाऊन आग विझवतील. याबाबत विभागातर्फे प्रस्ताव तयार केला जाणार आहे.