नागपूर : सोलर पॅनलमधून केवळ दिवसा नव्हे, तर रात्रीही वीज निर्मिती करता येऊ शकते, असा दावा नागपूरमधील संशोधकांनी केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ (लिटू) यांच्या संयुक्त संशोधनातून हे तंत्र विकसित करण्यात आले असून, या नाविन्यपूर्ण संकल्पनेला युनायटेड किंगडमकडून डिझाइन नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. भविष्यात सौरऊर्जा क्षेत्रात हे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते, असा संशोधकांचा दावा आहे.
हे संशोधन नेमके काय आहे?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ढोबळे आणि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाच्या मदतीने सोलर पॅनल पुन्हा सक्रिय करून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सध्या सोलर पॅनलची मर्यादा काय आहे?
सोलर पॅनल सूर्यप्रकाशातील फोटॉनच्या मदतीने वीज तयार करतात. दिवस मावळल्यानंतर किंवा सूर्यप्रकाश कमी झाल्यावर वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात घटते. त्यामुळे रात्री सौरऊर्जेचा थेट वापर करता येत नाही.
संशोधकांनी त्यावर कोणता उपाय शोधला?
संशोधकांनी सोलर पॅनलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला एलईडी दिव्यांची रचना केली आहे. हे दिवे पवन ऊर्जेद्वारे तयार झालेली ऊर्जा साठवून ठेवतात. सूर्यप्रकाश कमी होताच सेन्सरच्या मदतीने एलईडी दिवे आपोआप सुरू होतात आणि त्यांचा प्रकाश सोलर पॅनलवर पडतो. त्यामुळे कृत्रिम प्रकाशाच्या साहाय्याने रात्रीही पॅनलमधून वीज निर्मिती सुरू राहू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
बायफेशियल सोलर पॅनलची भूमिका काय?
नव्या पिढीतील बायफेशियल सोलर पॅनल दोन्ही बाजूंनी प्रकाश स्वीकारतात. वरच्या बाजूला थेट सूर्यप्रकाश, तर खालच्या बाजूला परावर्तित प्रकाशाचा उपयोग होतो. संशोधकांनी याच तंत्राचा वापर करून दोन्ही बाजूंनी एलईडी प्रकाश देण्याची संकल्पना विकसित केली आहे.
या संशोधनाचा फायदा कोणाला होऊ शकतो?
हे तंत्र यशस्वीपणे प्रत्यक्षात आले, तर घरगुती ग्राहक, उद्योग, शेती, तसेच रस्त्यावरील दिव्यांसाठी अधिक काळ सौरऊर्जेचा वापर करता येईल. त्यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.
हे संशोधन समाजापर्यंत कधी पोहोचणार?
संशोधकांच्या मते, या तंत्राचा प्रत्यक्ष वापर शासनाच्या माध्यमातून घरे, उद्योग आणि सार्वजनिक वीज व्यवस्थेत झाला, तरच या संशोधनाचा समाजाला मोठा फायदा होईल. सध्या या संकल्पनेला युनायटेड किंगडमकडून डिझाइन नोंदणी प्रमाणपत्र मिळाले असून, पुढील टप्प्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.
संशोधकांचे कौतुक कोणी केले?
या संशोधनाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, तसेच लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य आणि कुलसचिव डॉ. निरज खटी यांनी दोन्ही संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
