नागपूर : उत्तर प्रदेशात चालणारे ‘बुलडोझर राजकारण’ महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही, असा गंभीर इशारा नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खान याने दिला आहे.

एका घरावर बुलडोझर चालवल्यास मुस्लिम समाजात शंभर नवे नेते तयार होतील, असे खळबळजनक वक्तव्य फहीम खानने केले आहे. एका वृत्त वाहिनीवर बोलताना फहिम खान बोलत होता. नागपूरमध्ये मार्च २०२५ मध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी फहीम खानवर सहभागाचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि सुमारे चार महिने तो तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. या दंगलीनंतर नागपूर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबीयांचे घर बुलडोझर कारवाईद्वारे पाडले होते. फहिम खान पुढे म्हणाला, माझ्यावरील दंगलीचे आरोप हे राजकीय कटाचा भाग असून दंगल उसळली तेव्हा आपण घरीच होतो. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत फहीम खानची पत्नी अलीशा खान हिने प्रभाग क्रमांक तीनमधून मोठा विजय मिळवला आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) पक्षाचे एकूण सहा नगरसेवक नागपूरमध्ये निवडून आले असून, त्यामुळे पक्षाचे शहरातील राजकीय बळ वाढल्याचे चित्र आहे. पत्नीच्या विजयानंतर फहीम खान अधिक आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे. आणखी एखाद्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली, तर सध्या केवळ दोन प्रभागांपुरते मर्यादित असलेले सत्ताधारी उद्या संपूर्ण शहरातून साफ होतील, असा इशाराही त्याने दिला. तसेच, महापालिकेने पाडलेले आपले घर पुन्हा उभारणार असल्याचेही फहीम खानने स्पष्ट केले आहे.

नागपुरात दंगल प्रकरण काय ?

नागपुरात १७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपूर शहरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटाओ’ अशा घोषणा देत आंदोलन केलं. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेल्या प्रतीकात्मक कबर जाळली. यानंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर सांयकाळी एक अफवा पसरवण्यात आली.

सकाळी जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये जाळण्यात आलेल्या कबरीच्या कपड्यावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरवण्यात आली. ही अफवा पसरल्यानंतर सायंकाळचा नमाज आटोपून दोनशे ते तीनशे लोकांचा जमाव तिथे तयार झाला आणि तो घोषणा देऊ लागला. याच लोकांनी ‘आग लावून टाकू’ असे हिंसक बोलणे सुरू केले. आणि त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला,” फडणवीस म्हणाले. “त्याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध त्यांना तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस स्थानकात आमंत्रित करण्यात आलं. त्यांची तक्रार एकीकडे ऐकून घेत असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे. काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. तिसरी घटना भालदारपुरा भागात सांयकाळी साडेसात वाजता झाली. तिथे ८० ते १०० लोकांच्या जमावाने एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी आणि काही चारचाकी वाहनं जाळण्यात आली, असे त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.