लोकसत्ता टीम

नागपूर : नागपुरातील दंगल प्रकरणात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून या दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्यासह ५० दंगलखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायबर पोलिसांनी केली सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात फहीम खान व त्याच्या साथीदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरातील दंगल भडकविणारा मास्टरमाईंडला फहीम खान याला पोलिसांनी अटक केली असून त्यानेच सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करुन गणेशपेठ ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. पोलिसांनी ५१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान याचा समावेश होता. या प्रकरणात सध्या २०० पेक्षा जास्त दंगलखोरांची नावे पोलिसांनी समोर आणली आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाल गांधीगेट परिसरात औरंगजेबाचे छायाचित्र आणि त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केले होते. मात्र, त्यावर हिरव्या रंगाची चादर होती. ती चादरीवर ‘आयत’ लिहिलेली होती, असा आरोप होता. त्यामुळे मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान याने काही युवकांना चादर जाळल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले. त्यांची माती भडकवली त्यांना दंगल उसळवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर फहीम खान याने स्वत: पुढाकार घेऊन तो गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहचला. त्याच्या पाठीमागे जवळपास ४० ते ५० युवकांचा जमाव होता.

फहीमने गणेशपेठच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आणि चादर जाळणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्याची भाषा त्याने वापरली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्याला आश्वासन देऊन परत पाठवले होते. मात्र, यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान यांच्या नेतृत्वातील युवक जात असताना त्यांनी नारोबाजी केली. त्यांनी घोषणा दिल्या. त्यामुळे चिडलेले बजरंग दलाचे सदस्य आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी प्रत्युत्तरात घोषणाबाजी केली. त्यामुळे वाद चिघडला. त्या तरुणांनी गोंधळ घालणे सुरु करताना पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले आणि परिसर रिकामा केला.

या घटनेच्या दोन तासांनंतर अचानक दगडफेक सुरु झाली. पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावणाऱ्या तरुणांचा मोठा जमाव रस्त्यावर आला. त्यामुळे दंगल भडकली. या दंगलीत पोलिसांनी गुन्हे दाखल करुन जवळपास ५१ तरुणांवर गुन्हे दाखल केले. ४६ जणांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठे‌वण्याचे आदेश दिले. मात्र, ही दंगल भडकरण्यास कारणीभूत ठरलेला फहीम खान हा पोलिसांना गुंगारा देऊन पळाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. फहीम शेख खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नागपूर शहराध्यक्ष आहे. त्यानी २०२४ मध्ये नागपूर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही आणि त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हे दाखल

दंगल भडकवण्यासाठी कारणीभूत असलेल्या जवळपास तीनशेवर सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली. यामध्ये १७२ अकाउंट वर आक्षपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ आढळून आले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या ४० टक्के व्हिडिओ आणि फोटो सायबर पोलिसांनी डिलीट केले आहेत. सोशल मीडियावर दंगली संदर्भात आक्षेपार्य मजकूर किंवा व्हिडिओ टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. -लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, नागपूर सायबर क्राईम.