नागपूर : नागपूरमधील ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेचा (एनजीओ) संचालक रियाज फाजिल काझी याला महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव आणि धार्मिक सक्तीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या स्वयंसेवी संस्थेवर बंदीची तसेच त्याला निधी कुठून मिळतो, याबाबत मागणी केली आहे.
मानकापूर पोलीस ठाण्यात रियाज काजीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांना नमाज पठण, रोजा ठेवण्याची सक्ती करणे आणि इस्लामिक चालीरिती पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप रियाज काजीवर आहे. चार महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेने नागपूर हादरले असून नाशिक येथील टीसीएस कंपनीतील घटनेसारखाच हा प्रकार असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमंत जांभेकर यांनी इस्लामची सक्ती करण्याऐवजी अशा लोकांनी पाकिस्तानात जावे. अशा घटनांनी हिंदू समाज अधिक कट्टर होऊन त्यांचे गंभीर परिणाम होईल. हिंदूंची सहनशक्ती बघू नये, आता यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती करणाऱ्यांना बदडून काढू, असा इशाराही डॉ. हेमंत जांभेकर यांनी दिला. सरकारने त्याच्या स्वयंसेवी संस्थेवर ताबडतोब बंदी आणून त्याला कुठून निधी मिळतो, याची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. जांभेकर यांनी केली.
काय आहे प्रकरण?
रियाझ काझीच्या संस्थेत काही कर्मचारी कामाला असून त्यात काही तरुणींचादेखील समावेश आहे. जुलै २०२४ मध्ये त्याने एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणीने त्याला समज दिली होती. मात्र तरीदेखील तो वारंवार तिची छेड काढत होता. दरम्यान, कार्यालयातील तरुणींना तो वारंवार आपण पालन करत असलेल्या धर्माशी निगडीत चालीरितींची माहिती देत होता. त्यानुसार आचरण करण्याचा दबावही टाकत होता. त्याच्या वागण्याला कंटाळून काही तरुणींनी नोकरी सोडली. काही दिवसांपूर्वी रियाझने नोकरी सोडून गेलेल्या तरुणीच्या आईला फोन केला. त्याने तुमची मुलगी कशा रितीने वागते याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. हा प्रकार कळताच तरुणी एकत्रित आल्या व थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्याच्याविरोधात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत चौकशीला सुरुवात केली. तेव्हा रियाझ काझीने धार्मिक चालीरितींचे पालन करण्यासाठी दबाव टाकल्याची बाब प्राथमिक तपासातून समोर आली. पोलिसांनी रियाझ काझीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला रात्रीच अटक केली. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यासंदर्भात मानकापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हरीश काळसेकर यांना विचारणा केली असता त्यांनी रियाझ काझीच्या अटकेला दुजोरा दिला.
कोण आहे रियाज काजी?
रियाज काजी गेल्या अनेक वर्षांपासून ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’, ‘फिक्र’ व ‘पढे हम, पढाये हम’ या स्वयंसेवी संस्थांमार्फत रस्त्यांवरील मुलांना शिकवतो. यासाठी तो समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेत होता. या उपक्रमासाठी त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कारही वादग्रस्त ठरला होता. या त्याच्या संस्थांमध्ये मुलीही काम करतात. परंतु प्रथमच चार मुलींनी त्याच्याविरुद्ध धर्मांतरणाची तक्रार दाखल केल्याने खळबळ माजली. मागील विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या समर्थनार्थ त्याने प्रचारही केला होता. या उमेदवाराने मतदारांना किराणा किटचे वाटप रियाज काजीच्या पश्चिम नागपुरातील गोरेवाजा, झिंगाबाई टाकळी, ताजनगर या गोदामातून झाले होते. या गोदामावर त्यावेळी पोलिसांनी छापाही घातला होता.
