नागपूर : नागपूरमधील ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेचा (एनजीओ) संचालक रियाज फाजिल काझी याला महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव आणि धार्मिक सक्तीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागपुरात खळबळ माजली असून भाजयुमोच्या एका पदाधिकाऱ्याने त्याचा भंडाफोड केल्याचा दावा केला जात आहे.

मानकापूर पोलीस ठाण्यात रियाज काजीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांना नमाज पठण, रोजा ठेवण्याची सक्ती करणे आणि इस्लामिक चालीरिती पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप रियाज काजीवर आहे. चार महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. परंतु या चार महिला कर्मचाऱ्यांना गाठून रियाज काजीच्या काळ्या कृत्याची माहिती भाजयुमोने घेतल्याचे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष विकी पांडे यांनी नमुद केले. विशेष म्हणजे रिजाय काजी धर्मांतरासाठी दबाव आणत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अनेक तरुणींनी त्याच्याकडून नोकरी सोडली. या तरुणींशी चर्चा केली. त्यानंतर त्याच्याकडे काम करणाऱ्या लहान मुलींंनाही तो इस्लामिक चालीरिती पाळण्यासाठी दबाव टाकत असल्याचे समजले. त्यामुळे चारही तरुणींना एकत्र करून पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी बळ दिल्याचे विकी पांडे यांनी नमुद केले. अखेर रियाज काजीविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे विकी पांडे यांनी नमुद केले.

दिल्लीतील शाहीन बाग आंदोलन कनेक्शन

राजधानी दिल्लीतील शाहीनबागमध्ये २०२० मध्ये नागरिकता दुरूस्ती कायद्याविरोधात मुस्लिम महिलांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन दीर्घकाळ सुरू होते. या आंदोलनात नागपुरातून कपडे, भाजीपाला पुरविण्यात येत होता. रियाज काजीचा भागीदार सलमान अलीद्वारे कपडे, भाजीपाला आंदोलकांना पुरविण्यात येत होते, असा दावा भाजयुमोचे पश्चिम मंडळ अध्यक्ष विकी पांडे यांनी केला.

विहिंपने केली संस्थेवर बंदीची मागणी

या घटनेने नागपूर हादरले असून नाशिक येथील टीसीएस कंपनीतील घटनेसारखाच हा प्रकार असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉ. हेमंत जांभेकर यांनी इस्लामची सक्ती करण्याऐवजी अशा लोकांनी पाकिस्तानात जावे. अशा घटनांनी हिंदू समाज अधिक कट्टर होऊन त्यांचे गंभीर परिणाम होईल. हिंदूंची सहनशक्ती बघू नये, आता यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती करणाऱ्यांना बदडून काढू, असा इशाराही डॉ. हेमंत जांभेकर यांनी दिला. सरकारने त्याच्या स्वयंसेवी संस्थेवर ताबडतोब बंदी आणून त्याला कुठून निधी मिळतो, याची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. जांभेकर यांनी केली.

कोण आहे रियाज काजी?

रियाज काजी गेल्या अनेक वर्षांपासून ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’, ‘फिक्र’ व ‘पढे हम, पढाये हम’ या स्वयंसेवी संस्थांमार्फत रस्त्यांवरील मुलांना शिकवतो. यासाठी तो समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेत होता. या उपक्रमासाठी त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कारही वादग्रस्त ठरला होता. या त्याच्या संस्थांमध्ये मुलीही काम करतात. परंतु प्रथमच चार मुलींनी त्याच्याविरुद्ध धर्मांतरणाची तक्रार दाखल केल्याने खळबळ माजली. मागील विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या समर्थनार्थ त्याने प्रचारही केला होता. या उमेदवाराने मतदारांना किराणा किटचे वाटप रियाज काजीच्या पश्चिम नागपुरातील गोरेवाजा, झिंगाबाई टाकळी, ताजनगर या गोदामातून झाले होते. या गोदामावर त्यावेळी पोलिसांनी छापाही घातला होता.