नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालय असलेल्या स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा करणारे निनावी पत्र समोर आल्याने बुधवारी संध्याकाळी शहरात मोठी खळबळ उडाली. समाजमाध्यमांवर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विविध ठिकाणी सखोल तपासणी सुरू केली आहे.
सदर पत्र नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पोस्टाद्वारे २७ एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. ‘डीएसएस’ नावाच्या एका अज्ञात संघटनेने हे पत्र पाठविल्याचा उल्लेख असून त्यात संघाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे.
पत्रात काय दावा?
इंग्रजीतील या पत्रात संघ मुख्यालय, रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर तसेच नागपूर मेट्रोच्या काही ठिकाणी ‘सिझीयम-१३७’ ही रेडिओॲक्टिव्ह पावडर टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पावडर अत्यंत धोकादायक असून त्यामुळे अनेक जण बाधित होऊ शकतात, अशी धमकीही देण्यात आली आहे.
याशिवाय ऑरेंज आणि ॲक्वा लाईनवरील मेट्रो गाड्यांच्या आसनांवर तसेच भाजप-संघ कार्यालयाच्या मार्गावरील बसमध्येही ही पावडर टाकल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पदार्थ कॅन्सर रुग्णालयातून मिळविल्याचा दावाही करण्यात आला आहे. संपूर्ण नागपूर ‘रेडिएशन’च्या धोक्यात असल्याचा उल्लेख करत तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पूर्वीच्या घटनेचा उल्लेख
काही दिवसांपूर्वी दोरसभवन मेट्रो स्थानकाच्या मागील भागात सापडलेल्या डेटोनेटर्स व जिलेटिनच्या कांड्यांचा उल्लेख करत, ती स्फोटके आपणच ठेवली होती आणि तो केवळ इशारा होता, असेही पत्रात नमूद आहे. “खरा खेळ आता सुरू झाला आहे,” अशी धमकी देण्यात आली आहे.
तपास यंत्रणा सतर्क
या प्रकरणामुळे पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सर्व संवेदनशील ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्राथमिक पातळीवर या दाव्यांची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
