नागपूर: मध्य भारतातील वैद्यकीय हब म्हणून नागपूरकडे बघितले जाते. उपराजधानीत विविध भागातून आलेल्या रुग्णांना वेळेत व सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविणाऱ्या रुग्णवाहिकांचीच स्थिती चिंताजनक असल्याचे वास्तव प्रादेशिक परिवहन विभागाच्या अलीकडील कारवाईतून समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ६० रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यात आली असून, तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या रुग्णवाहिकांमधील दोष बघून अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला.

नागपूरमधील रुग्णवाहिकांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर तसेच पूर्व नागपूर उपप्रादेशिक कार्यालयाने २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवली. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पाच दिवसांच्या या मोहिमेत एकूण ३३९ रुग्णवाहिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० वाहनांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. संबंधित वाहनचालक आणि मालकांवर कारवाई करून एकूण ४ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. तसेच गंभीर अनियमितता आढळलेल्या तीन रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या.

रुग्णालयांच्या संख्येत आणि आरोग्यसेवांच्या विस्तारात शहर आघाडीवर असले, तरी रुग्णवाहिकांसारख्या मूलभूत सेवेतच बेपर्वाई आढळत असल्याने ‘वैद्यकीय केंद्र’ होण्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णांच्या जीविताशी थेट संबंध असलेल्या या सेवेत शिस्त व सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी प्रशासनासह संबंधित संस्थांवर आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोणत्या त्रुटी आढळल्या?

तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही रुग्णवाहिकांची योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्रे मुदतबाह्य झाली होती. काही वाहनांकडे वैध विमा व प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (पी. यू. सी.) नव्हते. काही प्रकरणांत वाहनचालकांकडे वैध परवाना नसल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय काही रुग्णवाहिकांमध्ये यांत्रिक त्रुटी आढळल्या. दाट लोकवस्तीच्या भागांतून धावणाऱ्या या वाहनांमुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी नोंद अधिकाऱ्यांनी केली आहे.

मागील कारवाईचाही धडा निष्फळ?

मागील वर्षी २५ एप्रिलपासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत ७८ सदोष रुग्णवाहिकांवर कारवाई करून ६ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. वारंवार कारवाई होऊनही नियमभंग सुरूच असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय सेवेशी थेट संबंधित असलेल्या या वाहनांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आरटीओकडून ‘आरएमए’ला सूचना

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेला परिवहन विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकांची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.