नागपूर : नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, पक्षश्रेष्ठींनी नियुक्त केलेले निरीक्षक ११ ते १५ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर केदार गटाच्या प्रभावामुळे ही निवड प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरत आहे.

नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री सुनील केदार यांचे वर्चस्व कायम असल्याचे मानले जाते. जिल्हा ग्रामीण काँग्रेस संघटनेवर त्यांचा प्रभाव असल्याने जिल्हाध्यक्ष निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांची नियुक्तीही केदार यांच्या पाठिंब्यामुळे झाल्याची चर्चा होती. त्यामुळे यंदाच्या निवड प्रक्रियेतही त्यांच्या भूमिकेला निर्णायक महत्त्व राहणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. विविध गटांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक ११ एप्रिल रोजी नागपुरात दाखल होऊन ११ ते १५ एप्रिलदरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करतील. या काळात ते विविध स्तरांवरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत. जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदांसाठी योग्य उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठका निर्णायक ठरणार आहेत.

या दौऱ्यात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार असून, खासदार, आमदार, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा काँग्रेसच्या भविष्यासाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे.