नागपूर : नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुमारे २० अधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) परिवहन खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटे सापळे रचत असल्याचा आरोप केला होता. मात्र, गेल्या नऊ महिन्यांतील आकडेवारी वेगळेच चित्र दाखवते. लाचखोरीच्या प्रकरणांत अडकलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संख्येत नागपूर ग्रामीण आरटीओ राज्यात वरच्या क्रमांकावर असून, कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरटीओतील भ्रष्टाचारावर गडकरींचे मत काय ?

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा परिवहन विभाग आणि आरटीओ कार्यालयांतील भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे. गेल्या नऊ महिन्यांत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांवर एसीबीने टाकलेल्या आठ छाप्यांमध्ये नऊ अधिकारी-कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. त्यापैकी चार कारवाया नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित असून, चार अधिकाऱ्यांना पकडण्यात आले.

ग्रामीण आरटीओतील अधिकाऱ्यांची तक्रार काय होती ?

नागपूर ग्रामीण आरटीओतील मोटार वाहन निरीक्षकांसह अन्य सुमारे २० अधिकाऱ्यांनी परिवहन खात्यातील काही आजी-माजी अधिकाऱ्यांच्या संगनमताने एसीबी खोटे सापळे रचत असल्याची तक्रार केली होती. ही तक्रार देण्यासाठी सर्व अधिकारी शासकीय गणवेशात एसीबी कार्यालयात पोहोचले होते. या शक्तिप्रदर्शनाची गंभीर दखल घेत एसीबीने परिवहन आयुक्त कार्यालयाला अहवाल पाठवला होता.

आरटीओ अधिकारीही वादग्रस्त…

नागपूर ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण हेही वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. एका अधिकाऱ्याची नागपुरात बदली रोखण्यासाठी कट रचल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तसेच तत्कालीन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी त्यांची नागपूरबाहेर बदली करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही.

सापळ्यांची माहिती…

एसीबीच्या सापळ्यात अडकलेले अधिकारी

ऑक्टोबर २०२५ मध्ये नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत एका सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला, डिसेंबर २०२५ मध्ये गोंदिया येथे आणखी एका सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला, तर २५ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगरमधील कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोन महिला मोटार वाहन निरीक्षकांना एसीबीने पकडले. मार्च २०२६ मध्ये नागपूर ग्रामीणच्या रामटेक येथे एका मोटार वाहन निरीक्षकाला, त्याच महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे दुसऱ्या मोटार वाहन निरीक्षकाला, तर ११ जून २०२६ रोजी नागपूर ग्रामीणमधील आणखी एका मोटार वाहन निरीक्षकाला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या सर्व कारवायांपैकी चार सापळे नागपूर ग्रामीण आरटीओ अथवा त्याच्या अखत्यारितील कार्यालयांशी संबंधित होते.

परिवहन आयुक्त काय म्हणाले ?

एसीबीच्या कारवाईनंतर परिवहन खात्याने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. उर्वरित दोघांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक सेवा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. – राजेश नार्वेकर, परिवहन आयुक्त, मुंबई.

ग्रामीण आरटीओ अधिकाऱ्याचे म्हणणे काय ?

एका अधिकाऱ्याच्या संगनमताने नागपूर ग्रामीणमधील काही अधिकाऱ्यांवर खोटे सापळे रचून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. न्यायालयात संबंधित अधिकारी आपली बाजू मांडत आहेत. या कारवायांमध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांसह आवश्यक पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते योग्य वेळी समोर आणू. माझ्याविरोधातही काहींनी चुकीचे आरोप व तक्रारी केल्या असून न्यायालयातून मला निश्चित न्याय मिळेल. – विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण.