नागपूर : वादग्रस्त देखाव्यांची परंपरा असलेल्या नागपुरातील प्रसिद्ध गुलाब पुरीच्या गणपतीची अखेर रविवारी सांयकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी देखाव्यातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेव्दारे महिलांचा सन्मान तर दुसरीकडे बदलापूर प्रकरणावर मौन असे चित्र साकारण्यत आले आहे. बदलापूर मुद्यावर राजकारण नको, असे सूचित करण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

मध्य नागपुरातील पाचपावली परिसरात नागपुरातील हा गुलाब पुरीचा गणपती प्रसिद्ध आहे. गमपती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने दरवर्षी देशातील राजकीय, सामाजिक, धार्मिक विषयांवर देखावे तयार केले जातात. अनेकदा वादग्रस्त विषयांवर हे देखावे असल्याने ते पोलिसांकडून जप्त केले जातात. त्यामुळे नेहमी हा गणपती चर्चेत राहतो.

हे ही वाचा…बुलढाणा : अतिसारामुळे तिघांचा मृत्यू?; मृतदेह झोळीतून नेले घरी

शनिवारी सर्वत्र गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलाब पुरी यांचा मुलगा चंद्रशेखर पुरी यांनी रविवारी सायंकाळी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली व देखावा लावण्यात आला. बदलापूर प्रकरणावर राजकारण नको, असा संदेश देणारा फलक लावण्यात आला आहे. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकड़े लक्ष वेधण्यात आले. यावर काही तरी करा असा असा संदेश देत पंतप्रधान बदलापूर प्रकरणावर चुप का आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या देखावा वादग्रस्त ठरू शकतो. मंडपापुढे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लाण्यात आला आहे.

हे ही वाचा…गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…

काय आहे पार्श्वभूमी

१९५९ पासून चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.पाचपावली परिसरात त्याची सुरुवात झाली. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी हे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधणारे देखावे गणपतीजवळ तयार करीत असत.ते वादग्रस्त ठरल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात होती. ही परंपरा कायम आहे. यापूर्वी या मंडळाने राम मंदिर, वाढीव वीजबिल, नवीन मोटर वाहन कायद्यातील जाचक अटी, संविधान बदल आदी प्रसंग देखाव्यातून मांडले आहे. अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिमा देखाव्यात तयार केल्या जातात. २०१० साली पुरी यांनी केलेल्या देखाव्यात तत्कालीन तत्कालीन पंतप्रधानांची प्रतिमा साकारली होती. त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी त्या जप्त केल्या होत्या. १९९३ साली गुलाब पुरी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर, नरेंद्र यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे..