Naib Tehsildar Attacked by Mining Mafia : नागपूर : जिल्ह्यात गौण खनिज माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनावरील त्यांचा धाक कमी झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटर फरफटत नेण्यात आले. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे महसूल प्रशासनात संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडले नेमके?

ही घटना ५ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बोरी नाईक परिसरात घडली. अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी महसूल पथकासह तातडीने घटनास्थळी धाड टाकली. त्यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार, आनंद मस्के आणि महसूल सेवक नीलेश तिरपुडे उपस्थित होते.

अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

कारवाई सुरू होताच माफियांनी आक्रमक पवित्रा घेतला. एका ट्रॅक्टर चालकाने थेट निकाळजे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला होत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, महसूल पथकाने जेसीबी (एमएच ४० सीक्यू २३८८) अडवण्याचा प्रयत्न केला असता चालक मयूर थोटे (रा. दहेगाव, ता. मौदा; सध्या मुक्काम राजोला, ता. कुही) याने वाहन भरधाव वेगाने पळवले. त्याला थांबवण्यासाठी निकाळजे जेसीबीवर चढले. मात्र, चालकाने त्यांना लटकलेल्या अवस्थेतच वाहन चालवत नेले. निकाळजे खाली पडावेत आणि गंभीर जखमी व्हावेत, या उद्देशाने जेसीबी काटेरी झुडपांतून नेण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकारात त्यांचा शर्ट फाटला असून हाताला गंभीर जखमा झाल्या.

घटनेची माहिती मिळताच वेलतूर पोलीस ठाण्याचे एपीआय राऊत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कुही पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जेसीबी चालक मयूर थोटे याला अटक केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

गौण खनिज माफियांचे मनोबल का वाढले

दरम्यान, महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे गौण खनिज माफियांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रशासनावरच जीवघेणे हल्ले होत असताना अवैध उत्खननाविरोधातील कारवाई कितपत प्रभावी ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.