स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीने योगदान दिले. शिवाजी महाराज, राणाप्रताप हे परकीयांविरुद्ध त्यांच्या पद्धतीने लढले. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग निवडला, तर सुभाषचंद्र बोस त्यांच्या पद्धतीने लढले. दयानंद सरस्वती आणि विवेकानंदांचा लढा समाजाचे स्वभान जागृतीसाठी होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा स्वभान जागृत करण्यासाठी लढला व लढत राहणार, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आणि स्वातंत्र्यलढ्यात संघ सहभागी का झाला नाही, या आरोपाचे उत्तर अप्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न केला.

अखंड भारत दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने रविवारी येथील सुरेश भट सभागृहात आयोजित ‘उत्तिष्ठ भारत’ कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “भारतावर हजारो वर्षांपूर्वीपासून अनेक आक्रमणे झाली.

विरुद्ध लढा देताना भारताला परकीयांपासून मुक्त करण्यासाठी त्या-त्या वेळेच्या गरजेनुसार अनेकांनी प्रयत्न केले. जसे आक्रमण तसे उत्तर देण्यात आले. शिवाजी महाराज, राणा प्रताप यांची लढण्याची पद्धत वेगवेगळी होती. सुभाषचंद्र बोस यांनी एका वेगळ्या पद्धतीने लढा दिला. महात्मा गांधी यांची लढाई अहिंसेच्या मार्गाची होती. समाजसुधारकांनी समाजातील उणिवा दूर करण्यासाठी लढाई लढली. तर दयानंद स्वरस्वती आणि विवेकानंद यांच्या प्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजात स्वभान जागृत करण्याचे कार्य केले.”, असे डॉ. भागवत म्हणाले. संघाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, अशी टीका होत असते. त्यावर आज डॉ. भागवत यांनी स्वातंत्र्याबरोबर समाजात स्वभान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य संघाने केल्याची स्पष्टोक्ती दिली.

२०४७ पर्यंत अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल –

संघाने २०४७ पर्यंत अखंड भारताचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासंदर्भात बोलताना डॉ. भागवत म्हणाले, अखंड भारत निर्माण करण्यासाठी त्याग, समर्पण आणि बलिदानाची तयारी ठेवायला हवी. आज भलेही संपूर्ण भारतातील (अखंड भारत) जल, जमीन, जंगल, प्राणी यावर आपला हक्क नाही, पण उद्या तो आपल्याकडे असेल. लोक अखंड भारताबाबत बोलतात, पण त्याबाबत त्यांच्या मनात भीती असते, ती काढून टाकल्यास अखंड भारत होईल.