नागपूर : जिल्ह्यातल्या कोंढाळी तालुक्यातील पुसागोंदी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुले आणि एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण पोलिसांतर्गत केळवद येथेही असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. खाजगी सैनिकी प्रशिक्षण शाळेत ही घटना उघडकीस आल्याने ग्रामीण पोलीस यंत्रणा हादरली आहे.
मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची सैनिकी शाळा ही सावनेर तालुक्यातील आहे. विद्यार्थिनींनी या बाबत लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप केल्याने .संचालकाला पोक्सोसह विविध कलमांखाली अटक करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं सैनिकी शाळेत….
सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी ‘वाईट स्पर्श’ आणि अश्लील कृत्ये आणि लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. या प्रकरणात १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मध्यरात्री मुलींना कार्यालयात बोलावून हा छळ केल्याचेही मुलींनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत नमूद आहे. यातील आणखी संतापजनक बाब म्हणे विद्यार्थिनींनी या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी झालेला प्रकार शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र त्यानीही या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे.
तब्बल ११ मुलींनी सोडली शाळा….
अकादमीत असलेल्या ५६ विद्यार्थ्यांमध्ये १४ मुली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर १४ पैकी ११ विद्यार्थिनींनी शाळा सोडल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू, अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवासी शाळेतही अल्पवयीन विद्यार्थी असुरक्षित….
जिल्ह्यातल्या कोंढाळी तालुक्यातील पुसागोंदी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी झालेल्या अनैसर्गिक कृत्यासोबतच मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विस्मृतीतही जात नाही तोच सावनेर तालुक्यात एका लष्करी शाळेतही अल्पवयीन विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात संचालकाला पॉक्सो आणि इतर विविध कलमांखाली अटक केली आहे. त्यामुळे निवासी शाळांत शिक्षण घेणाऱअया अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे.
