नागपूर: अरे भाऊ काय सांगू, चारच दिवसांपूर्वी मुलाखतीसाठी इथं आलो होतो. जिथं घटना घडली तिथंच काम मिळणार होते. पगारही ठरला. १६ हजार दरमहा. ठेकेदार उद्यापासूनच जॉईन हो म्हणाला. त्याने माणूस बोलावून लगेच कपड्यांचे मापही घ्यायला लावले. बुटाचा नंबरही ठरवला… पण आम्हीच नाही म्हणालो. साहेब सण तोंडावर आहे. वावरात काम आहे. होळी सण झाल्याशीवाय जमणार नाही… असे सांगितले आणि चार तारखेला येऊ असे सांगून आम्ही निघालो. आज सकाळी ही घटना कानावर आली आणि थोडक्यात वाचलो जी साहेब… नाही तर आमच्या कुटुंबावरही टाहो फोडण्याची वेळ आली असती. आपली तर इथं भेटच झाली नसती ना भाऊ… अंगाचा थरकाप उडविणारी ही हकीकत आहे, दोन तरुणांची.
जितेंद्र चरडे (३०)आणि त्याचा मित्र प्रतिक जवंजाळ हे दोघेही घटनास्थळावरून बाहेर पडत असताना मनातल्या भितीचा थरकाप शब्दांत मांडताना सांगत होते.

जितेंद्र म्हणाला, भाऊ चार दिवसांपूर्वी आमची याच ठिकाणी मुलाखत झाली होती. या कंपनीला वाडी- वडधामनातली मनोकामना (एम वन) कंपनी कंत्राटी कामगार पुरवते. गेल्या आठवड्यात आम्ही कंपनीचा ठेकेदार राजपूत याला भेटलो. त्याने मुलाखतीसाठी आम्हाला राऊळगावच्या एस.बी.एल. एनर्जी परिसरात बोलावले. जिथे घटना घडली त्याच्या समोरच ऑफिसमध्ये आमची मुलाखत झाली.

आमची मुलाखत सुरू होती तेव्हाच फटाके फोडल्या सारखे आवाज येत होते. आम्हाला भिती वाटत होती. जमीनीला हादरे जाणवत होते. बाहेर पडताना ठेकेदाराला आवाजाबाबत विचारले तर तो असे आवाज नेहमीच येतात असे म्हणाला. घाबरण्यासारखे काही नाही तुमचे काम आत नाही, तुम्हाला फक्त बाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचेय, असे म्हणत त्याने आम्हाला सांगितले.

जितेंद्रचे हे बोलणे सुरू असताना त्याचा मित्र प्रतिक म्हणाला, भाऊ जाऊद्याना जी आम्ही कालच कामावर आलो असतो, तर आज तुमच्याशी बोलत नसतो. ठेकेदाराचे एकले असते तर आमच्या कुटुंबावरही डोकं फोडण्याची वेळ आली असती. काम देताना पगार १८ हजार पगार मिळेल. हातात १६ हजार मिळतील असे ठेकेदार म्हणाला होता. सुटी मिळणार नाही. सुटी घेतली तर पैसे कापून पगार मिळेल, असे तो सांगत होता.

जीवाला इतकी मोठी भिती आहे, हे माहित असते तर आम्ही कामाला तयार झालो नसतो. आमच्या कपड्याचे माप ठेकेदाराने घेतले होते मात्र देवानंच वाचवलं भाऊ रोज मरणाच्या दारात काम करण्यापेक्षा दुसऱ्या कंपनीत काम पाह्यतो असे सांगत दोघेही गाडीला किक मारून धूळ उडवत निघून गेले.