नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटातील आणखी एका जखमी महिलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सोमवारी पहाटे अपयशी ठरली. त्यामुळे या स्फोटातील मृतांची संख्या १८ वरून वाढत १९ वर पोचली आहे. स्फोटात जखमी झालेल्या कामगारांवर सध्या नागपुरातील दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी गंभीररित्या होरपळलेल्या १८ जणांवर एकट्या ऑरेंजसिटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.

रुग्णालयातील सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार जखमींपैकी रंजना उत्तम घागरे या महिला कामगाराची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सोमवारी पहाटेच्या सुमारास अपयशी ठरली. त्यामुळे मृतांची संख्या आता वाढून १९ वर पोचली आहे.

आणखी चार अत्यवस्थ

रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात होरपळलेल्या आणखी चार जणांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. प्रशासाकडून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुपारपर्यंत रुग्णालयाच्या वतीने अधिकृत सविस्तर वैद्यकीय अहवाल माध्यमांना दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजारगाव घटनेची पुनरावृत्ती

गेल्या वर्षी अमरावती मार्गावरील सोलर स्फोटक कंपनीत असाच भीषण स्फोट झाला होता. त्यात ९ कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांवर नागपुरात घाट रोडवरील स्मशानभूमीत सामूहिक दाहसंस्कार करण्यात आले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती राऊळगाव येथेही झाली आहे. राऊळगावच्या स्फोटात भक्ष्यस्थानी पडलेल्यांच्या शरिराचे तुकडे झाले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी न्यायवैद्यक विभागाच्या टीमने डिएनए नमुने गोळा करणे युद्धपातळीवर सुरू केले आहे. स्फोटात दगावलेल्यांच्या रक्तातील नातेवाईकांच्या डीएनएचे नमुने घेतले जात आहेत. त्याला आणखी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर दाहसंस्काराची पुढील प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

सामुहिक अंत्यसंस्काराची चाचपणी

बाजारगाव प्रमाणेच प्रशासनाकडून सामूहिक अंत्यस्कार केले जातील, अशी माहिती प्रशासनातील सुत्रांनी दिली. यावर चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्त बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार आणि कंपनी प्रशासनात सोमवारी दुपारी बैठक होणार आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी पुन्हा पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून पुढील प्रक्रिया होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.