नागपूर: शहरातील १६ शाळांसह न्यायालय, महापौर कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालये बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या ई मेलचे धागेदोरे बांग्लादेश आणि फ्रान्समध्ये असल्याचे सायबर शाखेने केलेल्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. १९ ठिकाणी मिळालेल्या धमकीच्या मेल पैकी काही मेल बांग्लादेशातल्या दोन ठिकाणांवरून तर फ्रान्समधील एका ठिकाणावरून पाठवण्यात आल्याचे आढळले आहे.

दरम्यान स्फोटाच्या धमकीनंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही संबंधित शाळा आणि आस्थापनांमध्ये आणखी काही संशयास्पद आहे का याची कसून तपासणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक आणि सुरक्षेची काळजी घेणाऱ्या संबंधित यंत्रणांना सुचना केल्या.

या घडामोडीत खलिस्तानवादी संघटनांनी याची जबाबदारी स्विकारली असल्याने तपासाची दिशा ठरवून धमकी देणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकासह राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. स्फोटाची धमकी देणाऱ्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थेट उल्लेख केला आहे. त्यात संघाचे मुख्यालय नागपूर असल्याने एटीएस आणि एनआय या संस्थांनी तातडीने पोलीस आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. बॉम्ब स्फोटाच्या धमकीत ३१ तारखेचा उल्लेख असल्याने संपूर्ण यंत्रणेला पुढील काही दिवस अलर्ट राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सर्व शाळांना ३१ पर्यंत अलर्ट

स्फोटाच्या धमकीचा मेल पाठवणाऱ्यांनी ३१ ऑगस्ट या तारखेचा उल्लेख केल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधीत शाळांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. शाळा परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करावी, अनोळखी व्यक्तीकडून संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने संपर्क साधावा, शाळांमधील सीटीटीव्ही यंत्रणांची रोज तपासणी करावी असे निर्देश दिले आहेत.

सायबर तज्ज्ञ करत आहेत मेलचे सविस्तर विश्लेषण

धमकीचा ई मेल मिळाल्यानंतर सायबर शाखेने तातडीने मेलचा मूळ स्त्रोत शोधून काढण्यासाठी इंटरनेट सेवा पुरवठादाराचे धागेदोरे तपासले. ज्या आयपी पत्त्यावरून हे ई मेल पाठवण्यात आले होते, त्यापैकी दोन ठिकाणे बांग्लादेश आणि एक फ्रान्समधील असल्याचे समोर आले. सायबर तज्ज्ञांची टीम याचे आणखी सविस्तर विश्लेषण करत आहे.