नागपूर : सूर्य आग ओकत आहे. अनेक शहरातील तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. पुढील काही दिवस उष्ण लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास काम न करण्याचे आवाहन कामगारांना करण्यात आले आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस काम करण्यास सांगण्यात येत आहे.

उन्हाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो. त्यामुळे चार दिवसापूर्वी शाळेला सुट्टी देण्यात आली होती. आता पुन्हा त्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे आता शाळा लवकर भरेल, तसे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेत.

अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वेळेत बदल

अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. शाळेच्या परीक्षा संपल्या असून निकालही लावण्यात येणार आहे. परंतु पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शाळा सुरू आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत त्या सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येते. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याचे दिसते. मागील आठवड्यात नागपूरसह काही शहरांचे तापमान ४४ वर गेले होते. येत्या काळात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुपारी निघताना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. शक्यतो दुपारी २ च्या सुमारास घराबाहेर निघू नये, निघताना पुरेसे पाणी पिण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ७ वाजतापासून सुरू होणार असून १०.३० पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत.