नागपूर: शहरातील आघाडीच्या आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या १२ शाळांमध्ये मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास बाॅम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार अशी धमकी मिळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. शहरातील १२ शाळांच्या अधिकृत ई मेलवर सकाळी हा मेल पाठवण्यात आला होता. सकाळी शाळा उघडल्यानंतर मुख्याध्यापकांनी संगणक उघडताच खळबळ उडाली.

शाळांना बाॅम्ब स्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याने या शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार शाळेतील मुलांवर लादत असल्याची आगपाखड मेलमध्ये केली आहे. त्यामुळे या शाळा बाॅम्बने उडवून देण्याची वेळ आल्याचा उल्लेख धमकीतून करण्यात आला आहे.

बाॅम्बची धमकी मिळालेल्या शाळांमध्ये सेंटर पाॅईंटच्या भांडेवाडी, सदर शाळेसह केंद्रीय विद्यालयाच्या अजनी, काटोल, वायुसेना नगर येथील शाळांचा समावेश आहे. सोबतच जिल्हा न्यायालयाचाही समावेश आहे.

बाॅम्ब शोध व नाशक पथके पाचारण

बाॅम्बची धमकी मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकाला अलर्ट देण्यात आला. पोलीसांची पथके त्वरित शाळांमध्ये दाखल झालीं धमकीच्या मेलची तात्काळ गंभीर दखल घेत सर्व शाळांमध्ये बाॅम्ब शोध व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने संपूर्ण परिसर रिकामा करत तपासणी सुरू केली. सोबतच पोलिसांनी बाॅम्बचा नेमका ठिकाणा शोधण्यासाठी दुपारी १२च्या सुमारास श्वान पथकाला देखील पाचारण केले.

सायबर विभागाकडून मेलची तपासणी

सकाळी धमकीचा ई मेल मिळाल्यानंतर सायबर शाखेने मेल पाठवणाऱ्या आयपी पत्त्याची तपासणी सुरू केली आहे. हा मेल नेमका कुठून आला तो कोण पाठवला याचा तपास केला जात आहे.

पालकांची शाळांकडे धाव

शाळा परिसरात अचानक पोलीस पथके दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. काही पालकांना याची कुणकुण लागताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. दरम्यान गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. सोबतच सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केला.