सुनीता झाडे
आपल्या सगळ्यांच्या मुळाशी एक वस्ती असते, एक मोहल्ला असतो. एखाद खेड्यातला, गावातला, शहरालगतच्या भागातला तुकडा असतो. आपल्याला सीमा माहीत नसतात तोवर तेवढंच आपलं क्षितिज असतं. आपण तिथूनच उगवतो आणि तिथेच मावळतो. जगण्याच्या मर्यादा कळत नाहीत तोवर तेवढंच मर्यादित आपलं जगणं असतं. आणि ते अत्यंत निकोप असतं. सर्व नेणीव-उणिवांच्या स्वीकारासह आनंदी.
आपण लहान असतो तोवर आपली वस्तीही लहान असते. आपण मोठे होत जातो तशी आपली वस्तीही मोठी होत जाते. आपण आपल्यासोबत पाहत असतो एका वस्तीचा एक व्यक्ती म्हणून होत जाणारा प्रवास. किंवा एका व्यक्तीचा एक वस्ती म्हणून होत जाणारा प्रवास.

सेमिनरी हिल्सच्या सभोवती जंगलाने वेढलेल्या खोलगट भागात; १९७०-८० च्या सुमारास किंवा त्याआधीही, काही लोकांनी जमीन सपाट करून तिथल्याच दगड-मातीने लिंपून राहायला घरे तयार केली. एकाच्या शेजारी दुसरा, दुसऱ्याच्या शेजारी तिसरा… अशी घरे तयार झाल्यावर त्याला पहिले नाव पडले ‘फुकटनगर’.
तिथल्या रहिवाशांना फुकटात मिळालेला जमीन जुमला म्हणून इतरांनी ठेवलेले नाव ‘फुकटनगर’. त्यावेळी इथे बहुतांश नेपाळ, गढवाल, कुमाऊँ, उत्तर प्रदेश येथून कामासाठी आलेले चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी वस्ती करून राहत होते. काही जवळच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या शेतजमिनीवर काम करणारे शेतमजूर, काही निष्कासित आदिवासी व इतर बरेच जण तेथील स्वच्छ झऱ्याकाठी वस्ती करून राहात होते.

पहाडांच्या आत वसलेल्या त्या वस्तीत काळ्या कातळ दगडातून एक शुभ्र झरा वाहायचा. समोर उताराच्या दिशेने इतर छोटे-मोठे ओहळ मिळत त्याचा खळाळत्या प्रवाहाचा ओढा तयार व्हायचा. बायका ओढ्याकाठी भांडी-कपडे धूत, मुले मासोळीच्या मागे भिरभिर फिरत… गाय-वासरू पाणी पीत, पक्षीही पाण्यावर भुर्रभुर्र करत.
पावसाळ्यात या ओढ्याला भला मोठा पूर येई, इतका की तो कुणाच्या घरात शिरत, कुणाची भिंत वाहून नेत. विहिरीही तुडुंब भरलेल्या राहत. पावसाळ्यात तर विहिरीलाही पूर लागे. त्यानंतर सात-आठ महिने घरात ओल साठून राही. मग गारठवून टाकणारा हिवाळा आणि निवता उन्हाळा.

घरोघरी रेडिओ, क्वचित टीव्ही… गुणगुणणारे दिवस, बाहेर चांदण्यात गुंफलेल्या रात्री.

पुढे खूप लोकांनी त्यावेळची मोठी रक्कम देऊन, म्हणजे आठ, दहा, पंधरा, वीस हजारांत इमल्यासहित जुनी घरे विकत घेतली. या नव्या घरात ‘फुकटनगर’ बाद होऊन ‘सुरेंद्रगढ’ नाव प्रचलित होऊ लागले. सुरेंद्रसिंग या नावाच्या माणसाने वस्ती वसवली म्हणून मग ‘सुरेंद्रगढ’. पुढे काळाच्या ओघात सुरेंद्रगढ बदलायला लागले.
जितक्या व्यक्ती वाढल्या, तितके विषय वाढले, तितका वाद वाढला… मग न्यायासाठी कुठे चाकू, कुठे तलवारी, कुठे गुप्ती निघू लागल्या. या धाकाने काही जण मुलाबाळांना घेऊन दुसरीकडे राहायला गेले. जे जाऊ शकले नाहीत, ते तिथेच घडत-बिघडत राहिले.

कुठे बाहेर गेल्यावर सुरेंद्रगढमध्ये राहतो म्हटल्यावर एक अंतर येऊ लागलं. ते अंतर जाणवायला लागलं. आपण तूप म्हणून डालडा खातो, आपल्या डब्यातील पोळ्या लाल आहेत, आपल्या भातात खडे आहेत… हे जसजसे बाहेर पडायला लागलो, तसतसे कळायला लागले…पण असं कुठूनही परकं होऊन आलं की वस्तीत शिरताच विरून जायचं. अंगणातल्या झाडाच्या अंगाखांद्यावर झुलत पान-पान होऊन जायचं. इथे अंगणा-अंगणात पेरू, चिचबिलाई, आंबा, जांभळ, पिंपळ, पळस, डाळिंब, उंबर, चिंचा, चारोळ्या कितीतरी झाडं होती. अन् झाडाच्या कितीतरी कहाण्या होत्या…
बाकी खेळता-खेळता वस्तीतल्या एक-एक गोष्टी कानावर पडायच्या. कोणीतरी कुणासोबत पळून गेलं, कोणीतरी कुणासोबत फसलं, कोणीतरी कुणाचे पैसे लुबाडले. कुणाच्या घरी चोरी झाली, कुणाचे तरी या-त्या कारणावरून भांडण झाले, कुठे चाकू निघाला… तिकडे खाली खून झाला. कुठे दारू, गांजा, जुगार, पोलीस… नुसता हिल्लोळ. मात्र नवीन पिक्चर लागला की वस्तीत एक माहौल असायचा. वस्तीत तसे खरेखुरे हिरो, हिरोईन त्या स्टाईलने वावरताना दिसायचे. वस्तीत घरे जरी एका ओळीत असली, तरी पट्टेवाटप झाले नसल्याने घराला विशिष्ट असा पत्ता नसायचा. या चौकात, याच्या दुकानाजवळ, अशा-अशा गल्लीत… असे लिहिले जायचे.

कधीतरी काँग्रेसच्या काळात एका नगरसेवकाने वस्तीतील एका चौकात महात्मा गांधींचा पुतळा आणून बसवला. त्या बाजूला झेंडावंदन करायला एक चबुतरा तयार केला. सभोवतीची मोकळी जागा मिळवली. गांधीजींच्या पुतळ्याखाली ‘म. गांधी नगर’ अशी रिस्पेक्टेड फरशी बसवली. मग म. गांधी नगरातील बदललेल्या माणसांनी गणपती, शारदा, नवरात्र असे उत्सव घ्यायला सुरुवात केली. कुठे नव्याने मंदिरेही बांधली गेली. सणावाराच्या दिवसांत सकाळी मंदिरातील गाण्याने दिवसाची मंगल सुरुवात व्हायला लागली. वस्तीला एक धार्मिक वळण लागले. दुरून एक अजानही ऐकायला येऊ लागली.

आता म. गांधी नगरात महानगरपालिकेची एक शाळा आली. एक फिरता दवाखाना, बस स्टॉप, सीवर लाईन, सिमेंटचे रस्ते, नळाचे पाणी, घराघरात लाईट… शहरी बदल घडू लागले. वस्तीचे राहाणीमान उंचावू लागले. वस्तीला शहराचा नाद लागला.
भिंतीकडेला लागलेल्या सायकली, हातठेल्याच्या जागी आटोरिक्षा आली. आटोरिक्षाच्या जागी आता टॅक्सी, कार… लुना, मोपेड, जाऊन आता नवनवीन बाईक्स उडू लागल्या.

इकडे घरे मोठी होत गेली तशी झाडे लहान होऊ लागली. आधी उंचावरून पाहिले की हिरव्यागर्द झाडीत वसलेली छोटी-मोठी कौलारू घरे दिसायची… हळूहळू त्या झाडांतून घरे वर येताना दिसली तशी झाडे दिसेनाशी झाली. पर्यावरण आणि माणसाचा परिवर्तनाचा समांतर प्रवास सुरू झाला.
स्वच्छ ओढ्यात सांडपाणी सोडले तसा त्याचा मैला वाहून नेणारा नाला झाला. कुठे हा नाला बुजवून, कुठे नाल्याच्या बाजूला बांधकाम केले गेले. जसा मार्ग रोखला तसा तो तुंबत गेला. आता मधूनच तुंबलेल्या पाण्याचा कुबट वास वस्तीभर फिरत राहतो.

गेले की दरवेळेस वस्तीतील घरे अधिक पुढे आलेली दिसतात. माणसाचा कडेलोट झालाय. रस्त्यावरचा वापर, व्यापार दोन्ही वाढलेत. आताशा हलाख रस्त्यातून कासावीस होत, माणसांच्या पुरातून वस्ती वाहताना दिसते.
लहान असताना पाहिलेल्या देखण्या मुली लेकुरवाळ्या होऊन खंगलेल्या दिसतात. तरुण देखणे मुलगे अचानक प्रौढ, पोक्त… दोन्हीकडून नजरेला नजर दिली जात नाही. एक अपराधीपणाची चुटपूट.

संध्याकाळ मावळल्यावर अजूनही कर्ती न झालेली मुले एक-एक करून रात्रीची गांधी पुतळ्याखाली येऊन बसतात. सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. सगळे ऑन स्क्रीन
इकडून-तिकडे, तिकडून-इकडे ‘कॉकरोच’ होण्यात मशगूल…

commonwomen@gmail.com