नागपूर : गॅसचा तुटवडा जाणवत आहे. नागरिकांनी सिलिंडरसाठी रांगा लावल्या आहेत. सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई होत आहे. यातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा गटारातील गॅस संदर्भातील एक जुना व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहेत. तर इकडे गटारीच्या दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
महापालिका नागरिकांकडून मलजल आणि मलजल प्रवाह लाभ कर वसूल करते. परंतु, त्यानंतर त्यांना आवश्यक सुविधा मिळत नाही. सिवेज (गटार) लाईन जीर्ण झाल्याने लगतच्या विहिरींमध्ये दूषित पाणी झिरपत असल्याने नागरिकांना घरगुती वापरासाठीही ते पाणी वापरणे अशक्य झाले आहे. उन्हाळ्यात कुलर आदीसाठी पाण्याची गरज भासते, अशावेळी विहिरींमुळे मोठा दिलासा मिळतो.
परंतु, विहिरींचेच पाणी दूषित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात विहिरींच्या पाण्याचा वापर करता येत नसल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.शहरातील काही भागातील सिवेज लाईन फार जुन्या आहे. त्यांना तीस ते चाळीस वर्षांचा काळ झाला. या सिवेज लाईन जीर्ण झाल्या असून आतून खचल्याचे अनेकदा पुढे आले.
त्यामुळे सिवेज लाईन वारंवार तुंबत आहेत. तुंबलेले सांडपाणी झिरपून लगतच्या विहिरी व इतर ठिकाणी झिरपत आहे. त्यामुळे तेथील पाणीही दूषित होत आहे. प्रभाग १७ अंतर्गत येणाऱ्या चंद्रमणी भागातील अनेक विहिरींना सिवेज लाईनचे दूषित पाणी येत आहे. त्यामुळे त्याचा वापरच होत नसल्याचे सांगण्यात येते. या जुन्या जीर्ण सिवेज लाईन बदलण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाकडून ते होत नाही आहे.
यामुळे भविष्यात सिवेज लाईनला समांतर जलवाहिनीतील पाणी सुद्धा दूषित होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास नागरिक आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. दूषित पाण्यावर न्यायालयाने सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. त्यात १२ टक्के मलजल आणि १ टक्का मलजल प्रवाह लाभ कर वसूल करण्यात येत आहे.
अशाप्रकारे वर्षाला सरासरी ३० कोटी रुपये वसूल केले जाते. त्यानंतरही प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक सुविधाच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा निधी जातो कुठे, असा सवालही उपस्थित होत आहे.सिवेज लाईन फार जुनी आहे. त्या वारंवार तुंबत असल्याने सांडपाणी विहिरीत झिरपत आहे. परिणामी, विहीरी दूषित होत असून काही जणांना विहीरच बुजवावी लागली.
या सिवेज लाईन बदलण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक उमेश गेडाम यांनी व्यक्त केले. तर सिवेज लाईन जुन्या असून जीर्ण झाल्या आहे. त्या बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक सुहास नानवटकर यांनी सांगितले.
