नागपूर : जुन्या वैमनस्यातून कुख्यात शेख अक्रम ऊर्फ भुरू शेख रहमान (४२) याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘शरीफ टोळीवर’वर पोलिसांनी अखेर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत मकोका लागू केला. शरीफच्या टोळीने कट रचत संघटित पद्धतीने हा जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले. टोळीचा सूत्रधार कुख्यात गुन्हेगार शेख मोहसिन ऊर्फ ‘बाबा टायगर’ उर्फ ‘मुसा’ हा अद्याप फरार असून पोलिसांनी आतापर्यंत शेख शरीफ शेख सलीम, शाहबाज खान ऊर्फ सलमान बिल्ला खान, आमिर बशीर शेख, मोहम्मद साहिल अल्ताफ अन्सारी आणि मोहम्मद तौफिक शेख मोहम्मद आरिफ या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

बाबा टायगरच्या टोळीने ११ ऑगस्ट रोजी सोमलवाडा चौकातील ‘हॉटेल मेमरीज’समोर भुरूला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले गेले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथक दोनने यातले वास्तव चव्हाट्यावर आणले. जुन्या वैमनस्यातून पूर्वनियोजितरित्या हा हल्ला झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर अपघाता एवजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

हद्दपारीचे आदेश असतानाही शहरात घुसखोरी

कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर २०२३ मध्ये शेख अशफाक शेख मुश्ताक याची हत्या झाली होती. बाबा टायगर आणि त्याच्या टोळीने हा खून घडवून आणला होता. या टोळीने शेख अशफाक याचे डोके रेल्वे रुळावर आपटून ठेचले होते. पोलिसांच्या नोंदीनुसार, बाबा टायगरने साथीदारांसह गांजाचा साठा लुटण्यासाठी ही टोळी तयार केली होती. त्यामुळ मे महिन्यात तत्कालीन पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी बाबा टायगरला सहा महिन्यांसाठी हद्दपार केले होते. सहा महिन्यांसाठी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेशास मनाई असतानाही त्याने शहरात घुसखोरी करत भूरूवर जीवघेणा हल्ला घडवून आणला होता.

गुन्हे शाखेच्या तपासात अनेक बाबींचा उलगडा

पोलिसांच्या नोंदी नुसार गांजाच्या बेकायदेशीर विक्रीत गुंतलेले तस्कर माल (गांजा) चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे, अशा अनेक घटनांची पोलिसांकडे नोंदच होत नाही. बाबा टायगर आणि त्याच्या साथीदारांनी ही लूट करण्यासाठीच टोळी तयार केली. जुन्या वैमनस्यातून ११ ऑगस्ट रोजी भुरू हा सोमलवाडा चौकातील एका सावजी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला असता टोळीने त्याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यात भुरू गंभीररित्या जखमी झाला असून तो सध्या अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छवासावर मृत्यूशी झुंज देत आहे.