शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकट निर्माण झाले असले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. ही घटनात्मक लढाई असल्यामुळे त्यात शिवसेनेचे बंडखोर यशस्वी होणार नाहीत, असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

यशोमती ठाकूर नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होत्या. शिवसेनेतील फूट हा त्यांचा पक्षातंर्गत विषय आहे. एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री पद दिले, महत्त्वाची खाती दिलीत, भरपूर अधिकार दिले, मात्र त्या अधिकाराचा त्यांनी दुरुपयोग केला. काँग्रेसचा एकही आमदार त्यांच्याकडे गेला नाही. आम्ही सर्व एकत्र असून महाविकास आघाडी उरलेले अडीच वर्ष सरकार चालवेल, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.
हे सर्व भाजपचे षड्यंत्र आहे. ज्या राज्यात काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांचे सरकार आहे, तिथे अशाच पद्धतीने फूट पाडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

कुटुंबप्रमुख आजारी पडला तर लाथ मारून निघून जाल का?
राज्यात सध्या सुरू असलेला सत्तासंघर्ष अतिशय धक्कादायक आणि व्यथित करणारा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वांना कुटुंबीयांप्रमाणे सांभाळले, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. पण आज जर आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आपल्या घरातील कुटुंबप्रमुख आजारी पडला तर तुम्ही काय लाथ मारून निघून जाल? पाठीत खंजीर खुपसून निघून जाल, असे सवाल यशोमती ठाकूर यांनी बंडखोर आमदारांना विचारले आहे. ठाकूर यांनी एका चित्रफितीद्वारे भाजपवर आरोप केले. सत्तेतील लोकांनी जनसेवेसाठी सत्तेचा वापर करायचा असतो, मात्र भाजपकडून स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला जात आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी पूर आला आहे. आम्ही अस्वस्थ आहोत. चार दिवस झाले आपण अजून आपल्या मतदारसंघात जाऊ शकलो नाही. पण, आम्ही जनतेची सेवा करतच राहणार. सत्ता राहिली, नाही राहिली तरी फरक पडत नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. आसाममध्ये गेलेले आमचे काही सहकारी ईडीच्या कारवाईला घाबरून दुसऱ्या गटात गेले आहेत. ज्यांना दैवत मानले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून ते निघून गेले, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.