नागपूर : वाघाच्या हल्ल्यात चार निष्पाप ग्रामीण महिलांचा बळी गेल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे. ‘हा अपघात नाही, तर सरकारी अनास्थेमुळे झालेला खून आहे’, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

सरकारच्या निष्क्रियतेचे भयावह उदाहरण

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांना जीव गमवावा लागणे ही केवळ दुर्देवी घटना नसून वनविभाग आणि सरकारच्या निष्क्रियतेचे भयावह उदाहरण असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ‘सरकार अजून किती दिवस कुंभकर्णी झोपेत राहणार?’, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वनक्षेत्रात सुरक्षेच्या नावनो केवळ बैठका आणि घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात ग्रामीण नागरिकांना वाऱ्यावर सोडले जात असल्याची टीका त्यांनी केली. जंगलावर उदरनिर्वाह असलेल्या आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांच्या जीवाची किंमत सरकारला उरली आहे का, असा संतप्त प्रश्न त्यांनी केला.

सरकार बघ्याच्या भूमिकेत

पिडीत कुटुंबाला तात्काळ मदत, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि वनक्षेत्रात त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच ‘निष्पापांचा जीव जात असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे’, असा आरोपही त्यांनी केला. ‘आज या चार महिलांचा बळी गेला. आज आवाज उठवला नाही, तर उद्या पुन्हा एखादे कुटूंब उध्वस्त होईल. सरकारची ही उदासीनता आता जनतेला मान्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. राज्यसरकारने आता केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

दोन लहान मुले अनाथ

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केल्याी घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आठ वाजताच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात बचावाची कोणतीही संधी या महिलांना मिळाली नाही. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जंगल परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस पथकाने परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला. सुनिता कैशिक मोहुर्ले, संगीता संतोष चौधरी, अनिता दादाजी मोहुर्ले व कविता दादाजी मोहुर्ले अशी मृतकांची नावे आहेत. यातील सुनिता मोहुर्लेचे पती काही दिवसाआधी मरण पावले. तर तिचाही मृत्यू झाल्याने तिची दोन्ही लहान मुले अनाथ झाली आहेत.