नागपूर : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव बीट परिसरात एका शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृत वाघाचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. या घटनेमुळे जंगलालगतच्या परिसरातील उघड्या विहिरी पुन्हा एकदा वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे समोर आले आहे.

दुर्गंधीनंतर वाघाचा मृत्यू उघडकीस

चारगाव बगडे-हजारीचक मार्गावरील शेतकरी पांडुरंग गजभिये यांच्या शेतात ही घटना घडली. रविवारी सकाळी शेतात गेल्यानंतर परिसरात तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका वाघाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यांनी तातडीने शिंदेवाही वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनरक्षक सचिन चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, फुलझेले, ममता गायकवाड, वनरक्षक ऋषी जावडे, राहुल धनविजय यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

तीन दिवसांपूर्वी मृत्यू

उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, अरविंद जे., राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी बंडू धोतरे तसेच ‘स्वाब’ संस्थेचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक यश कायरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरपाम यांनी मृत वाघाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक पाहणीत वाघाचा मृत्यू विहिरीत पडून बुडाल्याने झाल्याचे समोर आले असून, मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

शेतातील उघड्या विहिरीचा प्रश्न कायम

दरम्यान, या घटनेनंतर जंगलालगतच्या शेतांमधील उघड्या विहिरींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वन्यजीव अभ्यासक यश कायरकर यांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जंगलालगतच्या परिसरात अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी वन विभागाने या भागातील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांना संरक्षणात्मक कठडे उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, आज ही दुर्घटना घडली. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही घडल्या घटना

विदर्भातील जंगलालगतच्या भागात उघड्या विहिरींमध्ये पडून वाघ, बिबट, रानडुक्कर आणि इतर वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे अशा विहिरींना संरक्षक जाळी किंवा कठडे उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.