नागपूर : शहरात सध्या भाजप व कॉंग्रेस एसआयआर प्रक्रियेवरून आमने-सामने आहेत. शहरात दोन्ही पक्षाच्या शहर अध्यक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. यापूर्वी महापालिकेत सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी एकमेकांवर सभागृहात आरोपाच्या फैरी झाडल्या. आता दोन्ही शहर अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.

कशावरून झाली सुरुवात?

बुधवारी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी एसआयआर प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने निष्पक्षपणे राबवणे अपेक्षित असताना, या प्रक्रियेत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग घेतला जात असल्याचा दावा केला. त्याबाबत त्यांनी भाजपने कार्यकर्त्यांना दिलेले ओळखपत्र देखील दाखवले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील आमदार निवास आणि रविभवन येथे सुमारे ५०० कार्यकर्ते बाहेरून येऊन वास्तव्यास असल्याचे गुडधे यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या बसद्वारे विविध मतदारसंघांत पाठवून शासकीय बीएलओंसोबत काम करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप गुडधे यांनी केला.

मुख्यमंत्री कार्यालयाचा प्रक्रियेत हस्तक्षेप

मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या हैदराबाद हाऊसमधूनही एसआयआर प्रक्रियेसंदर्भातील कामकाज सुरू असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मिळाल्याचा दावा गुडधे यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयाचा या प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप असल्यास तो नियमबाह्य ठरेल, असे सांगत प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली.

भाजप शहर अध्यक्षांचे कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षांना प्रत्युत्तर

काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत महापालिकेत काम केले. ते अभ्यासू नगरसेवक होते. परंतु शहर अध्यक्ष झाल्यापासून ते बिनबुडाचे आरोप करीत असून त्यांना आता मानसोपचाराची गरज आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपने संपूर्ण २१६७ मतदान केंद्रांवर बीएलए नियुक्त केले. परंतु काँग्रेसकडे तेवढे कार्यकर्तेच नसल्याने त्यांच्याकडे बीएलए फारसे नाही. गुडधे कुटुंब भाजपमध्ये होते. त्यांच्या वडील भाजपचे पहिले आमदार होते. त्यांना मंत्रिपद दिले. काँग्रेसकडून या कुटुंबाला भाजपने जेवढे महत्त्व दिले, तेवढे दिले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले असल्याचेही ते म्हणाले.

हवेतून बस चालविण्याचे दावे करणाऱ्यांना मानसोपचाराची गरज, कॉंग्रेस अध्यक्षांचा टोला

कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनीही भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या आरोपाचा शुक्रवारी समाजमाध्यमावर चित्रफित प्रसारित करून समाचार घेतला. नाल्यातून गॅस काढणे किंवा हवेतून बस उडविण्याचे दावे करणाऱ्यांनाच मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचा हल्ला चढवला. मी स्थायी समितीचा सदस्य असताना ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मला मानसोपचाराची गरज असल्याचे म्हटले. मी एकदम ठिक आहे. परंतु मानसोपचार तज्ज्ञांची गरज कुणाला आहे, हे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत असल्याचे ते म्हणाले. नागरिकांच्या मतदारांच्या पाठींब्याने निवडून येऊ शकत नाही, अशी खात्री भाजपची झाली आहे. त्यामुळे असले प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले.