नागपूर: रक्ताच्या नात्याची ओढ आणि बहिणीने भावंडांच्या सुरक्षेसाठी दिलेला लढा, कसा यशस्वी होऊ शकतो, हे एका बहिणीने दाखवून दिले. भिक्षेकरींच्या तावडीतून काही वर्षांपासून स्वतःला मुक्त करून घेतलेल्या या बहिणीने भावंडांविषयी असलेल्या ओढीतून माझे भाऊ परत आणून द्या हो.. अशी आर्त हाक जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. तिची ही आर्जव एकून कक्षातील अधिकाऱ्यांचे मन हेलावले आणि फळाला आली एक मोहिम.
तडक कारवाई करत बालसंरक्षण मंचने संत्रा मार्केट गाठले. परिसरातील पुलाखाली अत्यंत असुरक्षित वातावरणात जगणाऱ्या दोन भावंडांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. या प्रसंगाची पार्श्वभूमी देखील तितकीच भावूक आहे. यातील मोठ्या बहीणीने स्वतः ला काही वर्षांपूर्वी भिक्षेकरी मोहिमेअंतर्गत समाजकंटकांच्या तावडीतून सोडवून घेतले होते. त्यानंतर ती महिला व बालविकास विभागाच्या बालगृहात लहानाची मोठी झाली. शिक्षित झाली. सध्या ती ‘आधार गृहात राहून शिक्षण घेत आहे. मात्र, स्वतः सुरक्षित असली तरी तिचे मन पुलाखाली राहणाऱ्या लहान भावांसाठी व्याकुळ होते.
तिने बालविकास अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याकडे एक याचना केली. सर, माझ्या भावांना माझ्याकडे आणून द्या हो अशी मन हेलावून टाकणारी मागणी तिने केली. भावंडांप्रती तिची हो ओढ पाहून यंत्रणेतल्या कर्मचाऱ्याची मनेही हलवली. या मुलीचे वडील हयात नाहीत पण आई व्यसनाधीन झाली आहे. तिने दुसरा संसारही थाटला आहे. संत्रा मार्केट पुलाखाली ती मुलांकडून भिक्षा मागून घेत रहात होती. हे लक्षात येताच प्रशासनाने योजना आखली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत यांच्या संमतीने विशेष पथक तयार केले. सामाजिक सुरक्षा विभाग आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीने संत्रा मार्केट परिसरात शोध मोहीम राबवून दोन्ही बालकांना सोडवण्यात आले.
हक्काचा निवारा आणि नवे आयुष्य
मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना आता मोठ्या बहिणीसोबतच सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले. वर्षानुवर्षे पुलाखाली असुरक्षित जीवन जगणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या मोहिमेतील बाल संरक्षण अधिकारी साधना हटवार. सामाजिक सुरक्षा विभागाचे दीपक झाडे, लता गवई, संजय सोनवणे, चाईल्ड हेल्पलाईनच्या मीनाक्षी धडाडे, अनिकेत भिवगडे, रोशनी मेश्राम. न्यू व्हिजन फाउंडेशन आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या अश्विनी चोरे प्रियंका होटे यांनी सहकार्य केले.
