नागपूर : अमरावती महामार्गावरील सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीतील भीषण स्फोटाला सात महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला, मात्र या प्रकरणाचा तपास अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कामगार विभागाने आपला अहवाल सादर न केल्याने तपास रखडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील कारवाईवरही अनिश्चिततेचे सावट आहे.

एसबीएल स्फोटामुळे पुन्हा प्रश्न

काटोल परिसरातील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत महिनाभरापूर्वी भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो) तसेच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डिश) यांच्याकडे सोपविण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही यंत्रणांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

एसबीएलच्या तपासाने महिनाभरात गती घेतली असली, तरी सोलार कंपनीतील स्फोटाचा तपास सात महिन्यांपासून मागेच पडल्याचे दिसते. पेसो आणि डिश यांनी दोन दिवसांपूर्वी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांचा आणि कामगार विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कारण अजूनही गुलदस्त्यातच का?

मागील वर्षी ४ सप्टेंबर रोजी अमरावती महामार्गावरील बाजारगाव येथे सोलार एक्स्प्लोसिव्हच्या युनिटमध्ये हा स्फोट झाला होता. येथे विविध स्फोटके, ट्रिगर्स आणि ड्रोनसाठी लागणाऱ्या साहित्याचे उत्पादन केले जात होते. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले होते. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याचा खर्च कंपनीने उचलला होता. कामगार भरपाई कायदा, १९२३ नुसार कामगारांना भरपाईही देण्यात आली.

जिल्हाधिकारांच्या आदेशाची पालन नाही

स्फोटानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या माध्यमातून उपविभागीय दंडाधिकारी पीयूष चिवंडे यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, इतका कालावधी उलटूनही स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तपासाला गती देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक होणार असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी पीयूष चिवंडे यांनी सांगितले. सात महिन्यांनंतरही कामगार विभागाचा अहवाल प्रलंबित राहणे आणि कारण अद्याप अस्पष्ट असणे, हे अनेक प्रश्न उपस्थित करतात. स्फोटाचा तपास नेमका कुठे थांबला आहे? हा प्रश्नाचे उत्तर सध्या कुणाकडेच नाही.