नागपूर: खाकी पोषाख म्हटले की , रागीट स्वभाव, राकट माणूस आणि रुबाब असा काहीसा लोकांचा पाहण्याचा अनुभव असतो. पण याच खाकी पोशाखा आड ध्येयवेडा पर्यावरण रक्षक किती साधा असू शकतो हे अनुभवायचे असेल, तर एकदा पोलीस शिपाई सुमित राठोड यांची भेट घेण्यास विसरू नका.

नागपूर येथे कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक ४ मधील पोलीस शिपाई सुमित राठोड यांनी, १०० हून अधिक स्थानिक वृक्षांच्या प्रजातींचे १० लाखांहून अधिक बियाणे असलेला विशाल ‘बीजपेढी’ (Seed Bank) तयार केली आहे. आपल्या कामाच्या व्यस्त आणि कठीण जबाबदाऱ्या असूनही, राठोड फावला वेळ पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित करतात. यामध्ये बियाण्यांचे जतन, रोपवाटिका विकास, वृक्षारोपण, पक्षी संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमांवर त्यांचा विशेष भर असतो.

ते म्हणतात, “झाड लावणे सोपे आहे, पण ते जगवणे हेच खरे आव्हान आहे. हवामान बदल आणि घटत जाणारे हरित आच्छादन (झाडांचे प्रमाण) हे आपल्या भविष्यासाठी गंभीर धोके आहेत.

आज जतन केलेले प्रत्येक बी हे हरित भविष्याकडे टाकलेले एक पाऊल आहे. भावी पिढ्यांसाठी निरोगी आणि शाश्वत पर्यावरण मागे ठेवणे, हेच माझे ध्येय आहे.” वाढते तापमान, अनियमित पाऊस, जैवविविधतेचा ऱ्हास आणि हवामान बदल यांविषयीच्या वाढत्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर राठोड यांचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

काय केले बीजपेढीसाठी….

राठोड यांनी संवर्धनासाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. केवळ झाडे लावून थांबण्याऐवजी, त्यांनी स्वतः रोपनाटिका विकसित केली. या रोपवाटिकेत ते बियाण्यांचे संगोपन करतात. रोपे चांगल्या प्रकारे वाढावीत यासाठी ते त्यांच्या वाढीवर आणि विविध ठिकाणांसाठीच्या उपयुक्ततेवर बारकाईने लक्ष ठेवतात. तसेच झाडांचे आयुर्मान आणि पर्यावरणीय महत्त्व यांसारख्या घटकांचाही विचार करतात. या दृष्टिकोनामुळे हरित हजारो झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन शक्य झाले.

बियाणे विनामूल्य वितरित…

त्यांच्या संग्रहातील बहुतेक बियाणे परिपक्व झाडांपासून मिळवलेले आहे. जी त्यांनी स्वतः लावली आणि त्यांची निगा राखली. या बियाण्यांचे वैज्ञानिक पद्धतीने जतन केले जाते. व्यक्ती, शाळा, सामाजिक संस्था व पर्यावरण गट यांना ते विनामूल्य वितरित केले जाते. राठोड अनेकदा कुरिअर आणि टपाल खर्च स्वतःच उचलतात. बियाण्यांच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकच्या डब्यांचा वापर करतात. ज्यामुळे संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचा सुरेख मेळ त्यांनी साधला.

कचरा व्यवस्थापनातून पक्षांसाठा घरटी…

वृक्ष संवर्धनासोबतच, राठोड पक्षी संवर्धनासाठीही सक्रियपणे योगदान देतात. ते टाकून दिलेल्या साहित्यापासून पक्ष्यांसाठी खाद्यपात्रे आणि घरटी (निवारे) तयार करतात. ही घरटी शाळा, मंदिरे, सार्वजनिक उद्याने व सार्वजनिक जागांमध्ये बसवली जातात. शहरी जैवविविधतेच्या संरक्षणाला चालना देण्यासाठी दरवर्षी शेकडो पक्षी खाद्य आणि निवारे ते वितरित करतात.

तरूणांमध्ये पर्यावरण रक्षणाचेही रुजवले बीज

राठोड कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून लहान मुले व विद्यार्थ्यांसोबतही मोठ्या प्रमाणावर काम करतात. ते तरुणांना बियाणे संकलन, स्थानिक वृक्ष, जैवविविधता, जलसंवर्धन, प्लास्टिक प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या विषयांबद्दल शिक्षित करतात. मुलांना रोपे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे या प्रक्रियेत थेट सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून, पर्यावरणाविषयी जागरूक नागरिक घडवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

शेकडो सन्मान पण नाळ मातीशी…

त्यांच्या प्रयत्नांना अनेक मानसन्मान लाभले. यामध्ये ‘विशेष सेवा पदक’ (२०२२), ‘स्वातंत्र्य अमृत पदक’ (२०२२), ‘अंतर्गत सुरक्षा पदक’ (२०२३) आणि विविध सामाजिक व पर्यावरणीय संस्थांकडून मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. मात्र तरीही मातीशी नाळ जोडलेल्या राठोड यांच्यासाठी प्रत्येक झाडाची वाढ आणि संवर्धन कार्यात प्रत्येक मुलाचा सहभाग, हेच सर्वात मोठे पुरस्कार आहेत.

आपली विशाल बीजपेढी (सीड बँक), मोफत बियाणे वाटप जाळे, संवर्धन कार्य आणि निष्ठेच्या माध्यमातून सुमित राठोड यांनी हे सिद्ध केले आहे की, पर्यावरणाच्या क्षेत्रात अर्थपूर्ण प्रगतीची सुरुवात ही एखाद्या व्यक्तीच्या दृढ निश्चयाने केलेल्या प्रयत्नांतून होऊ शकते.