नागपूर: महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा नांगार फिरवला जातोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसआरपीएफ गट ५, येथील पोलीस भरती परीक्षेच्या पेपरमध्ये जे घडलंय, ते अत्यंत धक्कादायक आहे. एसआरपीएफ परीक्षेसाठी नुकताच पेपर घेण्यात आला. या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे कुठल्याही अधिकाऱ्यांनी तयार केलेले नव्हते. ही संपूर्ण प्रश्नपत्रिका एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील प्रश्न होते. जवळपास ८५ टक्के प्रश्न हे या पुस्तकातून आल्यामुळे या संपूर्ण भरती प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

अधिकाऱ्यांनी स्वतः प्रश्नपत्रिका काढण्याऐवजी एका खाजगी पब्लिकेशनच्या प्रश्नसंचातून १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर प्रशासकीय भ्रष्टाचाराची आणि अपयशाची मोठी साक्ष आहे, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेला आहे. १०० प्रश्नांसाठी हा पेपर घेण्यात आला यामध्ये सीआरपीएफ परीक्षा संदर्भात प्रश्नपत्रिका विभागाकडून तयार होणे अपेक्षित होते. मात्र कोणीही प्रश्नपत्रिका तयार करण्याची मेहनत न घेता सरळ एका खाजगी प्रकाशनाच्या प्रश्नसंच मधून ८५ प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आले. यामुळे भरती प्रक्रियेला गालबोट लागले आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे काही रोखठोक प्रश्न

१. ज्या मुलांकडे ते खाजगी पुस्तक आधीच होतं, त्यांना हे प्रश्न आधीच कळाले नाहीत का?
२. जर प्रश्न जसेच्या तसे येत असतील, तर याला ‘पेपर फुटी’ म्हणायचं नाही तर काय?
३. स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करण्याचं साकल्याने कष्ट घेण्याची तसदी पोलीस प्रशासनाने का घेतली नाही?

प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचं मोल काय? अशाने गुणवत्तेची कदर होणार की वशिल्याची? या घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे.