नागपूर : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत नागपूरमधील एका स्टार्ट-अप कंपनीने भारतीय सैन्य व निमलष्करी दलांसाठी अत्याधुनिक फुल-बॉडी बुलेटप्रूफ युनिफॉर्म विकसित केल्याचा दावा केला आहे. हा युनिफॉर्म पारंपरिक बुलेटप्रूफ जॅकेटपेक्षा अधिक व्यापक संरक्षण देणारा असून, संपूर्ण शरीराला सुरक्षा कवच पुरवतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

डीआरडीओचे माजी वैज्ञानिक डॉ. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा संशोधन प्रकल्प साकारण्यात आला आहे. नागपूर येथील काटोल रोडवरील (वडगाव) एका खासगी वैज्ञानिक उपकरण संशोधन संस्थेमध्ये हा युनिफॉर्म तयार करण्यात आला. सीएसआयआरकडून त्याची चाचणी घेण्यात आली असून, प्राथमिक स्तरावर तो प्रभावी ठरल्याचे सांगण्यात येते.

डॉ. महाजन यांनी २०१५ पासून या फुल-बॉडी बुलेटप्रूफ युनिफॉर्मवर संशोधन सुरू केले होते. कोविड-१९ काळात तसेच एका रस्ते अपघातामुळे त्यांचे संशोधन काही काळ थांबले. सुमारे ६५ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने या प्रकल्पावर काम सुरू केले. संशोधकांच्या माहितीनुसार, हा युनिफॉर्म मार्च २०२६ मध्ये लाँच करण्याचा मानस असून, त्यासाठी संरक्षण विभागाकडून आवश्यक परवानग्या व वेळ मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मार्चच्या अखेरीस संरक्षण विभागासमोर प्रत्यक्ष सादरीकरण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

युनिफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये

युनिफॉर्म एके-४७ रायफलच्या गोळ्यांपासून संरक्षण करेल. याचे वजन सुमारे ३.५ किलोग्रॅम असून त्यात ५ मेगापिक्सेलचा स्मार्ट कॅमेरा, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, माइन डिटेक्शन सेन्सर, केव्लर आधारित उच्च क्षमतेच्या फायबरचा वापर यासह अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. संशोधन पथकाने युनिफॉर्ममध्ये वापरलेले सिंथेटिक व केव्लर फायबर विशेष तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आले असून, त्यामुळे मजबूत बुलेट-रेझिस्टंट पॅनेल तयार होतो. हा युनिफॉर्म हलका, टिकाऊ असून विविध हवामान परिस्थितींमध्ये वापरण्यास योग्य असल्याचे सांगण्यात आले.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हा युनिफॉर्म मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला, तर आयात संरक्षण साहित्यावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळून स्थानिक संरक्षण उद्योगाला नवे बळ मिळेल.नागपूरमधील या संशोधनाकडे देशभरातून लक्ष वेधले जात असून, हे नवोपक्रम केवळ शहरापुरते मर्यादित न राहता, राष्ट्रीय पातळीवर भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.