नागपूर : आजच्या आधुनिक धावत्या जीवनशैलीत वाहन बाळगणे एक मूलभूत गरज बनली आहे आहे. मात्र वाढत्या इंधन दरांसोबत वाहनांची नियमित देखभाल करणे अतिशय महागडे झाले आहे. वाढत्या महागाईच्या काळात वाहतूक खर्च सर्वसामान्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. वाहनाची तसेच इंजिनची देखभाल करणे यासाठी महागड्या इंजिन ऑईलचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत रामदेवबाबा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी अपूर्व संजय डे याने एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.

महागड्या ऑईलवर स्वस्त पर्याय

विद्यार्थ्याने ‘इम्पीरियल ल्युब्रिकेंट’ नावाने एक नवीन सिंथेटिक इंजिन ऑईल तयार केले असून, यामुळे इंजिन अधिक काळ टिकते, इंधनाचा वापर कमी होतो आणि देखभाल खर्चात मोठी बचत होते, असा त्याचा दावा आहे. जुनी स्कुटी वारंवार बंद पडत असल्याने अपूर्वने या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्धार केला. त्यातून त्याने हे सिंथेटिक ऑईल विकसित केले. त्यामध्ये खास ल्युब्रिकेंट्सचा वापर करण्यात आला असून, पारंपरिक इंजिन ऑईलपेक्षा हे दोन ते तीन पट जास्त परिणामकारक ठरते, असा दावा त्याने केला आहे.

अपूर्वने याबाबत सांगितले की, या ऑईलमुळे इंजिनचे तापमान १५ ते २२ टक्क्यांनी कमी होते. परिणामी, इंजिनची कामगिरी सुधारते आणि त्याचे आयुष्यमानही वाढते. याशिवाय, १० ते १५ टक्के इंधन बचतही होते. वाहनाच्या देखभालीचा खर्च यामुळे लक्षणीयरित्या कमी होतो. सध्या अपूर्वने या ऑईलच्या व्यावसायिक निर्मितीसाठी काही कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहे. भविष्यात सामान्य लोकांसाठी स्वस्त आणि प्रभावी पर्याय उपलब्ध करून देणे, हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच्या या संशोधनाबद्दल विद्यापीठ पातळीवर त्याला पुरस्कार मिळाले असून, भविष्यात समाजोपयोगी संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा मानस आहे.

या कारणांमुळे नवे संशोधन खास

– बाजारात उपलब्ध सिंथेटिक इंजिन ऑईलपेक्षा दोन ते तीन पट स्वस्त.

– वाहनाच्या मायलेजमध्ये ५ ते २२ टक्के वाढ.

– कमी कार्बन उत्सर्जन, १० ते १५ टक्के प्रदूषण कमी

– वारंवार ऑईल बदलविण्याची आवश्यकता नाही.

भविष्यात ‘बायोडिग्रेडेबल इंजिन ऑईल’ तयार करायचे आहे. वाहनांच्या इंजिनाची कार्यक्षमता वाढवण्यासोबतच पर्यावरणाचे कमी नुकसान व्हावे अशाप्रकारच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या तयार केलेले सिंथेटिक इंजिन ऑईल प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी अनुकूल आहे. – अपूर्व डे, तरुण संशोधक